मध्य रेल्वेची ऍक्सिडेंट रिलिफ ट्रेन इगतपुरी घाटात तैनात! मुंबईत कुठेही अपघात झाल्यास घटनास्थळी पोहोचणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात दररोज 1800 हून अधिक लोकल गाडय़ांसह अनेक लांब पल्ल्याच्या मेल एक्सप्रेस चालवल्या जातात. सर्वाधिक वर्दळ असलेल्या मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा तांत्रिक बिघाडामुळे अपघात होऊन रेल्वे वाहतूक ठप्प झाल्यास ती तत्काळ पूर्ववत करता यावी, अपघातस्थळी आवश्यक मदत आणि यंत्रसामग्री पोहोचवता यावी म्हणून मध्य रेल्वेने इगतपुरी घाटात ऍक्सिडेंट रिलिफ ट्रेन तैनात केली आहे.

रेल्वे मार्गावर एखादा मोठा अपघात होऊन वाहतूक ठप्प झाल्यास ती पूर्ववत करणे मोठे आव्हान असते. त्यामुळे अशा आणीबाणीच्या वेळी यंत्रसामग्रीसह, अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सज्ज असलेली ऍक्सिडेंट रिलीफ ट्रेन महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळेच रेल्वेने सदरची एआरटी ट्रेन इगतपुरी घाटात तैनात केली  आहे. या एआरटी गाडय़ा आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी यंत्रसामग्री आणि उपकरणांनी सुसज्ज आहेत. सदरची गाडी अपघातस्थळी पोहोचताच तत्काळ काम हाती घेता येते. तसेच या गाडय़ांमुळे यंत्रसामग्री घटनास्थळी वाहून आणण्यासाठी लागणाऱ्या वेळेत मोठी बचत होते. दरम्यान अपघातकालीन आव्हानांना तोंड देण्यासाठी एआरटी इगतपुरी टीमने विविध तंत्रज्ञानाचा आणि साधनांचा भार कमी करण्यासाठी कल्पक उपकरणे तयार केली असून ती सदरच्या एआरटी ट्रेनवर बसवली आहेत. त्यामध्ये मटेरियल हँडलिंग मिनी क्रेन, इलेक्ट्रिक क्रेन, मिनी फोर्कलिफ्ट्स, जॅक-लिफ्टिंग डिव्हाइस आणि रेल्वे कम रोड ट्रॉलीजसारखी अनेक साधने विकसित करून बसवली आहेत.