मध्य रेल्वेच्या लोकलना अजूनही केवळ जलदच थांबे, प्रवाशांना करावा लागतोय द्राविडी प्राणायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य आणि पश्चिम रेल्वे 15 जूनपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्य़ांसाठी प्रत्येकी 350 फेऱ्य़ा जरी चालवित असली तरी मध्य रेल्वेवर अजूनही केवळ जलदच थांबे दिले जात असल्याने अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्य़ांसह इतर प्रवाशांचेही हाल होत आहेत. याऊलट पश्चिम रेल्वेने आपल्या ताफ्यात काही धिम्या लोकलचाही समावेश केल्याने तेथील अत्यावश्यक कर्मचाऱ्य़ांचा फायदा होत आहे.

सध्या मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अत्यावश्यक कर्मचाऱ्य़ांसाठी प्रत्येकी साडे तीनशे विशेष फेऱ्य़ा सुरू आहेत. या फेऱ्य़ांद्वारे साडे तीन लाख अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्य़ांना फायदा होत आहे. या फेऱ्य़ांमध्ये मध्य रेल्वेच्या लोकलना सुरूवातीपासूनच केवळ जलदच थांबे देण्यात आले आहेत. तर पश्चिम रेल्वेने मात्र काही लोकल धिम्या सोडल्याने अत्यावश्यक कर्मचाऱ्य़ांसाठी फायदा होत आहे. मध्य रेल्वेवर परळ स्थानकाच्या अवती भोवती महत्वाची रूग्णालये असून तेथे  जाणाऱ्य़ा आरोग्य कर्मचाऱ्य़ांना दादरला उतरून पुन्हा परळ गाठावे लागत आहे.

फार्मास्युटिकल कर्मचाऱ्य़ांनाही प्रवेश

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अत्यावश्यक लोकलमध्ये आता फार्मास्युटिकल कंपन्यांच्या कर्मचाऱ्य़ांनाही प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्व सरवारी आणि खाजगी रुग्णालयाच्या सर्व कर्मचाऱ्य़ांसह पॅथोलॉजिस्ट, लॅब टेस्टींग कर्मचाऱ्य़ांसह आता फार्मास्युटिकल कर्मचाऱ्य़ांनाही अत्यावश्यक लोकलमधून सोमवारपासून प्रवास करता येणार आहे.