फुकटय़ा रेल्वे प्रवाशांकडून 16 लाखांचा दंड वसूल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवून 1227 फुकटय़ा प्रवाशांना पकडून 7 लाख 72 हजार तसेच नियमित तिकीट तपासणीतून एकूण 15 लाख 70 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

सध्या लग्नसराई व उन्हाळी सुट्टी असल्याने रेल्वेतून मोठय़ा प्रमाणात प्रवासी ये-जा करीत आहेत. यामध्ये विनातिकीट प्रवासी, अनियमित व प्रमाणापेक्षा जास्त सामान घेऊन जाणारे, धूम्रपान व घाण पसरविणाऱया प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. कलबुरगी रेल्वे स्थानकावरील 19 अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून 6 हजार 455 रुपये दंड वसूल करण्यात आला. या कारवाईत तिकीट तपासणी विभागाचे 22 कर्मचारी व रेल्वे सुरक्षा बलाचे 21 जवान सहभागी झाले होते. ही कारवाई मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे व्यवस्थापक नीरकुमार दोहरे व वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक एल. के. रणयेवले, सहायक वाणिज्य व्यवस्थापक कल्पना बनसोडे, हर्षित बिश्नोई, सुदर्शन देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

रेल्वेतून प्रवास करताना प्रवाशांनी अनधिकृत विक्रेत्यांकडून कुठल्याही प्रकारचे अन्न, फास्टफूड व पिण्याच्या पाण्याची बाटली खरेदी करू नये, त्यांचा दर्जा निकृष्ट असू शकतो. अशा विक्रेत्यांवर रेल्वे प्रशासनाकडून यापुढेही कारवाई करण्यात येईल, असे रणयेवले यांनी सांगितले.