
मध्य रेल्वेच्या कोच यार्डात मियावाकी जंगल अवतरणार आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून केडीएम कंपनीने मियावाकी वनीकरण प्रकल्पाचा शुभारंभ केला. वनीकरण वाढवण्याबरोबर शहरी, निमशहरी, लहान शहरांमध्ये ऑक्सिजनची पातळी वाढवण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
देशामध्ये वनराईचे प्रमाण कमी होत आहे. त्याचे दुष्पपरिणाम दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर केडीएमने वृक्षजेन या उपक्रमांतर्गत मियावाकी मॉडेलवर आधारित 75 छोटी जंगले वाढवून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. ‘वृक्षजेन’ हे नाव वृक्ष व ऑक्सिजन या दोन शब्दांचे संयोजन आहे. ज्याप्रमाणे ऑक्सिजनशिवाय माणूस जगू शकत नाही, त्याचप्रमाणे झाडांशिवाय निसर्गाचे रक्षण करताच येणार नाही. या प्रकल्पाला सामाजिक उपक्रम गो शून्य, इस्कॉन गोवर्धन इको व्हिलेज, एनएसएस कॅडेट्सचे सहाय्य लाभले आहे. यावेळी केडीएमचे संस्थापक एन. डी. माळी, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी, गो शून्यचे सीईओ गोपाल रायथाथा आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जगप्रसिद्ध मॉडेल जगप्रसिद्ध मियावाकी वनीकरण हे मॉडेल जपानी वनस्पती शास्त्रज्ञ अकिरा मियावाकी यांच्या नावाने ओळखले जाते. या वनीकरणात फक्त देशी वृक्ष प्रजातींचा वापर करून जमिनीच्या छोटय़ाशा भागांवर घनदाट मिनी जंगल उभारले जाते.



























































