
मध्य रेल्वेने आपले नवे वेळापत्रक 14 डिसेंबरपासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कर्जत, खोपोली, कसारा या मुख्य उपनगरीय मार्गावर हे नवीन वेळापत्रक लागू केले जाणार आहे. या वेळापत्रकात मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या जादा नव्या लोकल फेर्यांचा समावेश किंवा फेर्यांचा विस्तार असण्याची शक्यता जरा कमीच वर्तविली जात आहे.
मध्य रेल्वेचा ठाण्याच्या पलीकडील प्रवास जीवघेणा झाला आहे. ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, बदलापूर येथील लोकसंख्या प्रचंड वाढल्याने प्रवासी संघटनांची फेर्या वाढविण्याची मागणी सातत्याने होत आहे. 2015-16 सालामध्ये 1,660 लोकल फेर्या होत्या. आता त्यांची संख्या 2018-19 सालामध्ये 1,774 पर्यंत पोहोचली आहे. पाचवा आणि सहावा मार्ग रखडला असल्याने नव्या फेर्या वाढविण्यावर मर्यादा आली आहे. ठाणे ते दिवा हा मधला टप्पा अपूर्ण राहिल्याने कल्याण ते कुर्ल्यापर्यंत पाचवा आणि सहावा मार्ग वापरता येत नाही. हा मार्ग पूर्ण झाल्यास लांब पल्ल्यांच्या गाडय़ांना स्वतंत्र कॉरिडॉर उपलब्ध होऊन किमान 100 लोकल फेर्या वाढविणे शक्य आहे. यंदा लांब पल्ल्यांच्या राजधानीसारख्या नव्या गाडय़ांच्या समावेश झाल्याने मधला वेळ भरून काढण्यासाठी लोकलच्या फेर्यांचे नियोजन त्यानुसार केले जाणार आहे. त्यामुळे मुख्य मार्गावरील लोकलच्या वेळांमध्ये जरा फेरफार होणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील 40 फेर्यांच्या वेळात थोडाफार बदल करून त्या एक ते पाच मिनिटांनी मागे-पुढे करण्यात येणार आहेत. यामध्ये सीएसएमटी ते ठाणे, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, कर्जत, खोपोली यासह अन्य लोकल फेर्यांच्या वेळा बदलणार आहेत.
क्षमतेच्या दीडशे पट फेर्या धावतायेत…
मध्य रेल्वेवर सध्या दररोज 1774 फेर्या चालविण्यात येत आहेत. यापूर्वी जानेवारी 2018 साली 26 नव्या फेर्यांचा समावेश करण्यात आला होता. त्यावेळी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील फेर्यांमध्ये कोणतीही वाढ न करता हार्बर मार्गावरील 10 फेर्या तसेच ट्रान्सहार्बर मार्गावरील 16 फेर्यांचा त्यात समावेश आहे. तसेच नोव्हेंबर 2018 सालामध्ये नेरूळ-सीवूड-बेलापूर-खारकोपर हा नवा चौथा कॉरिडॉर सुरू करण्यात आल्याने या मार्गावरील 40 नव्या फेर्यांचा समावेश झाला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या एकूण फेर्यांची संख्या 1774 वर पोहचली आहे. या फेर्यांना चालवताना मध्य रेल्वेला प्रचंड कसरत करावी लागत आहे. मध्य रेल्वेवर क्षमतेच्या दीडशे पट अधिक या फेर्या चालविण्यात येत असल्याचे एका अधिकार्याने सांगितले.


























































