
सामना ऑनलाईन, मुंबई
मुंबईच्या विकासासाठी सरकारला अनेक मोठी कामे मार्गी लावायची आहेत. त्यासाठी शिवसेना पूर्णपणे सरकारबरोबर आहे. त्यामुळेच मुंबईत मेट्रो रेल्वेचे जाळे वेगाने पसरत आहे. नवीन जलस्रोत किंवा जलसाठा तयार होत आहे असे शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले. दक्षिण मुंबईतील महायुतीचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या प्रचारार्थ भाजपचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी आयोजित केलेल्या ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमात आदित्य ठाकरे बोलत होते.
सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत झालेल्या या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी दक्षिण मुंबईतील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी तब्बल 20 हजार सोसायटय़ांचे प्रतिनिधी उपस्थित होते. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प प्रथमच सरप्लसमध्ये गेला असून याचे श्रेय संपूर्णपणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाते असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तर मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महानगरपालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात असाच उत्तम समन्वय राहायला पाहिजे. तेव्हाच दक्षिण मुंबई आणि मलबार हिलच्या विकासाला गती मिळेल असे सांगितले. अरविंद सावंत यांनी आपण गेली पाच वर्षे पूर्ण निष्ठsने आणि मेहनतीने काम केले. यापुढेही असेच काम करत राहू असे आश्वासन दिले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत राज्यभरात शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन आदित्य ठाकरे, मुनगंटीवार आणि लोढा यांनी केले. यावेळी नागरिकांच्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे देण्यात आली. कार्यक्रमात मुंबईतील व्यावसायिक, सामाजिक, सांस्कृतिक संस्था आणि कामगार संघटनेच्या प्रतिनिधींसह बँकर, डॉक्टर, वकील आणि विविध स्तरांतील मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
































































