
पंढरपूरमध्ये शुक्रवारी होणारा चैत्रीवारीचा सोहळा कोरोनाच्या सावटामुळे रद्द करण्यात आला आहे. एकादशीचे औचित्य साधून करण्यात येणारे धार्मिक विधी समितीच्या वतीने करण्यात येणार आहेत. वारीची परंपरा खंडीत होऊ नये, यासाठी प्रतिकात्मक स्वरुपात वारीचा सोहळा साजरा केला जाणार आहे. पंढरपूर शहराची कडक नाकाबंदी केली असल्याने भाविकांनी स्नानासाठी आणि दर्शनासाठी गर्दी करु नये, असे आवाहन मंदिर समिती आणि पोलीस यंत्रणेने केले आहे.
शहरातील विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून सर्व वाहने तपासणी करून शहरात सोडली जाणार आहेत. तसेच शहरात दिवसा रात्री पोलिसांच्या वतीने गस्त घालण्यात येणार असून याबाबत पंढरीतील मठ, धर्मशाळा ,लॉज यांनाही सक्त आदेश देण्यात आले आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा प्रतीकात्मक स्वरूपात चैत्र वारी साजरी होत आहे. वारी काळात पंढरीत भाविकांनी प्रवेश करू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने अहिल्या चौक, तीन रस्ता, चौथा मैल, वाखरी चौक रस्ता, कोरर्ती फूट रस्ता,गोपाळपूर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक,डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर,अर्बन बँक चौक या 9 ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे.
सर्व वाहने तपासणी करून शहरात सोडली जाणार आहेत. तसेच दिवसा व रात्री एकूण 5 वाहने पेट्रोलिंगसाठी नेमण्यात आली आहेत. ही वाहने शहराबाहेरून आलेल्या नागरिकांवर लक्ष ठेवणार आहेत. तसेच वारी काळात बाहेर फिरताना नागरिक आढळल्यास त्या नागरिकांवर कडक कारवाई केली जाणार आहे. शहरातील मठ,धर्मशाळा,लॉज यांची चार्ली पथकाकडून तपासणी केली जाणार असून सर्व व्यवस्थापक यांना वारकऱ्यांना मठामध्ये न ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
या प्रमाणे असेल बंदोबस्त
या बंदोबस्त करता 1 डीवायएसपी, 10 सह पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक, 4 पोलीस निरीक्षक, 100 पोलीस अंमलदार, 1 आरसीपी नेमण्यात आले आहेत. शहर व तालुक्यात वाढत्या कोरोनामुळे यंदाची चैत्र वारी प्रतीकात्मक स्वरूपात होत आहे. यात्रेसाठी भाविकांनी पंढरपूर शहरात प्रवेश करु नये असे आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, शहर पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी केली आहे. या मुळे भविकांसह वारकऱ्यांनी घरात राहूनच यात्रा साजरी करावी व कोरोनाला अटकाव करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे.




























































