
सामना ऑनलाईन । विजयवाडा
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आपल्या राज्यातील तरुण दांपत्यांना दोनपेक्षा अधिक मुलांची पैदास करण्याचे आवाहन केले असून त्याबद्दल त्यांना बक्षीस देण्याचीही घोषणा केली आहे. दोनपेक्षा अधिक अपत्ये असलेल्या उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणूक लढवण्यास असलेली बंदीही त्यांनी उठवली आहे. तो मनाई नियमच चंद्राबाबू यांनी रद्दबातल करून टाकला आहे.
आंध्र प्रदेशची लोकसंख्या झपाटय़ाने घटू लागली आहे. गेल्या दहा वर्षांत लोकसंख्येत 1.6 टक्के घट झाली. लोकसंख्या वाढीचे प्रमाण कायम राखण्यासाठी आपण तरुण दांपत्यांना हे आवाहन करीत आहोत असे त्यांनी सांगितले. आपल्या राज्यातील 50 टक्के लोकसंख्या ‘तरुण’ आहे. ही स्थिती कायम राखण्यासाठी तरुण दांपत्यांनी दोनपेक्षा अधिक मुले जन्माला घालणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
तेलंगणा या नव्या राज्याची निर्मिती होण्याआधी अखंड आंध्र प्रदेशची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 8 कोटी 46 लाख इतकी होती. आंध्र प्रदेशात अर्भक मृत्यूचे प्रमाण घटले आहे. 2014 सालात एक हजार अर्भकांत 37 इतके होते. आता ते घटून एक हजार अर्भकांत 10.51 इतके झाले आहे.



























































