
महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज जाहीर माफी मागितली. ‘माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी जाहीर माफी मागतो’, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.
महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा उभारल्या असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यांच्या त्या विधानानंतर गेले काही दिवस राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्या विधानाच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड येथे पाटील यांच्यावर शाईफेकही झाली. त्यानंतर हे प्रकरण अधिकच गरम झाले होते. अखेर आज चंद्रकांत पाटील यांनी एक पत्र लिहून जाहीर माफी मागितली.
चंद्रकांत पाटील यांनी या पत्रात असे नमूद केले आहे की, ‘छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पवित्र स्मृतीस आणि त्यांच्या अनुकरणीय कृतीस मी सदैव वंदन करत आलो आहे. त्यांच्याविषयी बोलताना माझ्याकडून बोली भाषेतील शब्द अनवधानाने निघाले, यात मला कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता. त्या शब्दाबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलीच आहे. पण त्यावरून घडलेल्या घटना माझ्या मनाला क्लेशदायक ठरल्या आहेत . शिवरायांच्या एका मावळ्यावर असे आरोप लावले जावेत याचे वाईट वाटत आहे. या मुद्दय़ावरून महाराष्ट्र अशांत होऊ नये असे मला वाटते. मी पुन्हा एकदा ह्या विषयात कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर जाहिर माफी मागतो.’
पोलीस, पत्रकारांवरील कारवाई मागे घ्यावी
‘माझी कोणाविषयी कोणतीही तक्रार नाही. तसेच ज्या कोणाला कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे त्यांची मुक्तता करावी, ज्या पोलीस अधिकाऱयांवर व पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे तीही मागे घ्यावी. तसेच जर पत्रकारांवर कारवाई करण्यात आली असल्यास तीही मागे घ्यावी, अशी सूचना करतो आहे. माझ्या तोंडावर ज्यांनी शाईफेक केली त्यांच्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही . माझ्या दृष्टीने ह्या वादावर मी पडदा टाकत आहे. आता हा वाद थांबवावा ही विनंती.’ असेही चंद्रकांत पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.


























































