
‘जलयुक्त शिवार’ योजनेबाबत राज्य सरकारने देवेंद्र फडणवीस यांची चौकशी लावली म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही ‘ईडी’मार्फत चौकशी लावली, असे म्हणणे योग्य नाही. ‘जलयुक्त शिवार’ योजनेबाबत जी चौकशी करायची ती करा; आम्ही त्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, सांगली महापालिकेत भाजपची सत्ता आहे. घनकचरा प्रकल्पाबाबत भाजपची भूमिका हा प्रकल्प व्हावा अशीच आहे. मात्र, सध्या निघालेल्या निविदेमध्ये अनेक त्रुटी आहेत. या त्रुटी दूर करून नव्याने निविदा काढण्याची आमची भूमिका आहे. मात्र, आयुक्तांनी स्थायी समितीत रद्द केलेला ठराव विखंडित करण्यासाठी शासनाकडे पाठवला आहे. सरकारने तो ठराव विखंडित केल्यास आम्ही कोर्टात जाऊ; परंतु चुकीचे काहीही होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.




























































