
पावसापासुन संरक्षण मिळावे यासाठी एका झाडाचा आसरा घेणाऱ्या दोन शेतकऱ्यांचा विज पडून मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारच्या वेळेस जिल्ह्यातील मूल तालुक्यातील बोंडाळा गावालागत घडली. विलास केशव नागापूरे वय (50) व गयाबाई पोरटे वय (60) असे मृत्तकाचे नांव आहे. तर नामदेव पोरटे आणि ताराबाई नागापूरे हे गंभीर जखमी आहे.
आज दुपारी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरूवात झाली. यावेळी विलास नागापूरे, नामदेव पोरटे, गयाबाई पोरटे आणि ताराबाई नागापूरे या शेतकरयांनी शेतावरून घराकडे निघाले. याचवेळी निंबाच्या झाडावर विज पडल्याने दोघांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी आहेत. जखमीना मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान विजेच्या धक्याने विलास नागापूरे यांच्या मालकीच्या 2 बकऱ्या ठार झाल्या. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.




























































