
‘बांबू वुमन ऑफ महाराष्ट्र’ म्हणून राज्याला सुपरिचित असलेल्या चंद्रपूरच्या मीनाक्षी मुकेश वाळके पालघरच्या आदिवासी महिलांना बांबू कलेचे धडे देत आहेत. वसई तालुक्यातील भालीवली गावात 20 आदिवासी महिलांना बांबू राखी, दिवे आणि दागिने बनविण्याचे 10 दिवसांचे प्रशिक्षण मीनाक्षी देत आहेत. विवेक रुरल डेव्हलपमेंट च्या सेवा विवेक प्रकल्पात मीनाक्षी यांचे प्रशिक्षण 3 एप्रिल पासून सुरु झाले आहे.
सेवा विवेकचे मनोज कुमार शाह आणि विजय चौथाईवाले यांच्या मार्गदर्शनाखाली लुकेश बंड आणि प्रगती बांगर यांच्या निरीक्षणात हे प्रशिक्षण सुरू आहे. बांबू राखीला देशात आणि पाच पाश्चिमात्य देशात लोकप्रिय करणाऱ्या मीनाक्षी वाळके यांच्या प्रशिक्षणाने पालघर जिल्ह्यातील बांबू राखीच्या कार्याला नवी झळाळी येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
मीनाक्षी यांनी यापूर्वी नक्षलग्रस्त गडचिरोलीच्या 25 मुला-मुलींना 40 दिवस बांबू कलेचे धडे दिले आहेत. त्यानंतर नाबार्ड आणि उमेद अभियानाच्या संयुक्त विद्यमाने संभाजीनगरच्या एमआयटी संस्थेकडून रोटेगाव येथे मीनाक्षी यांनी बचत गटाच्या महिलांना बांबू कलेचे धडे दिले आहेत. मीनाक्षी यांना येणाऱ्या काळात मराठवाड्यातील धाराशीव, झारखंडच्या रांची, छत्तीसगडच्या बस्तर, कोलकाता, उत्तराखंड, गुजरात आणि राजस्थानसारख्या राज्यातून महिलांना बांबू कलेचे धडे देण्याची निमंत्रण मिळाली आहेत. अवघ्या 29 वर्षाच्या मीनाक्षी या आपल्या सहा वर्षाच्या मुलाला सांभाळत महिलांच्या सक्षमीकरणाचा रथ पुढे नेण्यासाठी सरसावल्या आहेत.
इस्रायलच्या जेरुसलेम येथे एका कला शाळेत शिकवण्यासाठी निमंत्रण मिळालेल्या मीनाक्षी यांना कॅनडाचा इंडो कॅनेडियन आर्ट अँड कल्चरल इनिशिएटिव्ह संस्थेचा पुरस्कार मिळाला आहे. शिवाय यशवंतराव चव्हाण सेंटरचा बांबू उद्योगासाठी विशेष पुरस्कार 23 एप्रिलला प्रदान करण्यात येणार आहे. मीनाक्षी या स्वतः ग्रामीण क्षेत्रातील असून अत्यंत गरिबी आणि अभावाच्या परिस्थितीतून त्यांनी 2016-17 पासून बांबुचा वसा घेतला. त्यानंतर त्यांनी बांबू क्षेत्राला पाच नव्या कलाकृती दिल्या आहेत. बांबूचा क्यू आर कोड स्कॅनर हे त्यांचे डिझाईन विशेष गाजले आहे.





























































