
तृतीयपंथीयांकडे समाजात आजही तुच्छतेच्या भावनेने पाहिले जाते. सध्याच्या बदलत्या काळानुसार तृतीयपंथीयही त्यांच्यातील कलाकौशल्याची जपणूक करून यश संपादन करत आहेत. चंद्रपूर जिल्हा परिषदेने कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या एका महोत्सवात सर्वांचेच लक्ष वेधून घेणाऱ्या तृतीयपंथी निधी चौधरीने हे दाखवून दिले आहे.
नृत्य, लांब उडी, दौड स्पर्धा, फुटबॉल, अशा विविध स्पर्धांमध्ये निधीने 5 पुरस्कार पटकावले आहेत. विशेष म्हणजे निधी सध्या भगाराम तडोधी प्राथमिक आरोग्य केंद्रात ती परिचारिका म्हणून कार्यरत आहे. परिचारिका असलेली निधी जिल्ह्यातील पहिली तृतीयपंथीय आहे. जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास व्हावा तसेच दैनंदिन कामकाजातील ताणतणावातून सुटका व्हावी, या उद्देशाने चंद्रपूर जिल्हा परिषदेने तीन दिवसीय क्रीडा तथा सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केल होते.
या महोत्सवात जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. अंगभूत कला गुणांची मुक्तपणे उधळण केली, मात्र या महोत्सवात सर्वांचे लक्ष एका तृतीयपंथीयाने वेधले. तिचे नाव आहे निधी चौधरी. गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या चेक पिंपरी येथील ती रहिवासी आहे. भावजी आणि लता यांचं ती दुसरं अपत्य. आपल्याला मुलगा झाला या आनंदात असलेल्या आई – वडिलांना तिचं नाव निखिल ठेवलं. बालपणापासूनच तिला नृत्य करण्याची भारी आवड होती. वय वाढत गेलं अन् तिच्या लक्षात आलं की, आपण ना पुरुषात आहोत ना स्त्री, मात्र ती खचली नाही.
टाळ्या वाजवून पैसे मागायचे नाहीत, हे स्वाभिमानाला धरून नाही, म्हणून हे काम तिने टाळलं. सन्मानाने जीवन जगण्याचा निश्चय तिने केला. त्यासाठी निधी अपार मेहनत घेत आहे. तिच्या मेहनतीचं उशिरा का होईना तिला आता फळ मिळू लागलं आहे. नुकतेच तिने स्वत:ला सिद्ध करण्यासाठी पोलीस भरतीसाठी अर्ज दाखल केला आहे. पोलीस भरतीसाठी अर्ज दाखल करणारी जिहातील ती पहिली तृतीपंथी ठरली. सध्या ती प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी पद्धतीवर परिचारिकेचं काम करत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ती पहिली तृतीपंथी परिचारिका ठरली आहे. भविष्यात पोलीस होण्याचे तिचे स्वप्न आहे.
नृत्याने जिंकले मन …
जिल्हा परिषद चंद्रपूरतर्फे तीन दिवसीय क्रीडा तथा सांस्कृतिक महोत्सवात निधीने 5 पुरस्कार पटकाविले आहेत. तिने सादर केलेल्या नृत्यामुळे महोत्सवात उपस्थित असलेल्यांची मने भारावून गेली. निधीने त्यांचे मन जिंकले.




























































