
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
विकासकामांच्या भूमिपूजनासाठी संभाजीनगरात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात आज जोरदार राडा झाला. मुख्यमंत्र्यांनी थेट विद्यार्थ्यांना धमकीच दिली आणि पोलिसांनी शेतकरी दांपत्याला डांबलेही. आकांक्षा देशमुखला न्याय द्या, एमजीएम प्रशासनावर कारवाई करा, अशी मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चक्क कायदेशीर कारवाई करून तुरुंगात डांबण्याची धमकी दिली. राज्याचे प्रमुखच अशी भाषा वापरत असतील तर दाद कुणाकडे मागायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज रस्ते विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या ठिकाणी काही विद्यार्थी हातात फलक घेऊन ‘आकांक्षा देशमुखला न्याय द्या’, ‘एमजीएम प्रशासनावर कठोर कारवाई करा’ अशी घोषणाबाजी करत होते. मुख्यमंत्री भाषणाला उभे राहताच विद्यार्थ्यांच्या घोषणा टिपेला गेल्या. मुख्यमंत्री काहीतरी बोलतील या आशेने विद्यार्थी घोषणा देत होते. घोषणा थांबत नसल्याचे पाहून मुख्यमंत्री संतापले आणि त्यांनी या विद्यार्थ्यांना ‘शांत बसा, नाही तर कायदेशीर कारवाई करेन’ अशी थेट धमकीच दिली.
मुख्यमंत्री संतापल्याचे पाहून पोलिसांचे धाबे दणाणले. पोलिसांनी या विद्यार्थ्यांच्या हातातून फलक हिसकावून घेत त्यांना कार्यक्रम स्थळावरून दंडुके दाखवत अक्षरशः पिटाळून लावले. महिनाभरापूर्वी एमजीएमच्या वसतिगृहात आकांक्षा देशमुख या पदव्युत्तर शिक्षण घेणाऱया विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणात एमजीएम प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
दौऱयात पोलिसांची दंडेली; जमिनीसाठी आत्मदहनाचा इशारा देणाऱया शेतकरी दांपत्याला डांबले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात जाधववाडी येथील गोरक्षनाथ क्षीरसागर व त्यांची पत्नी वैशाली यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. यासंदर्भात क्षीरसागर दांपत्याने प्रशासनाला निवेदन दिले होते. बाजार समितीने आपल्या मालकीच्या आठ एकर जागेवर बेकायदा दावा सांगितल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात डोकेदुखी नको म्हणून पोलिसांनी निवेदन देताच गोरक्षनाथ यांना बुधवारीच उचलून त्यांची रवानगी थेट हर्सुल कारागृहात केली. मात्र वैशाली या बेपत्ता झाल्याने पोलीस त्यांचा शोध घेत होते. दुपारी साडेबारा वाजता कार्यक्रम स्थळी वैशाली दिसताच पोलिसांनी त्यांना अक्षरशः झडप घालून पकडले. दिवसभर त्यांना ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. मुख्यमंत्री मुंबईकडे रवाना झाल्यानंतर वैशाली यांना सोडण्यात आले. गोरक्षनाथ यांना मात्र सोडण्यात आले नाही.
पीक विम्याचे काय झाले? मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारणाऱया शेतकऱयाला अटक
फुलंब्री येथे भर कार्यक्रमात सुनील सुरेश सनान्से या शेतकऱयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पीक विम्याचे काय झाले, असा सवाल केला. दुष्काळावर काय करणार आहात ते बोला, असे सनान्से यांनी ठणकावताच पोलिसांनी त्यांना फरफटत कार्यक्रमातून बाहेर काढले आणि दिवसभर पोलीस ठाण्यात डांबून ठेवले.
























































