जोगेश्वरीत 30 लाखांचा चरस साठा पकडला, दोघा ड्रग्ज तस्करांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जोगेश्वरी परिसरात उच्च प्रतीचा चरस साठा पेडलर्सना देण्यासाठी आलेल्या दोघा ड्रग्ज तस्करांना अमली पदार्थविरोधी कक्षाच्या वांद्रे युनिटने रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून एक किलो 15 ग्रॅम वजनाचा व 30 लाख 45 हजार रुपये किमतीचा चरस जप्त करण्यात आला.

दोघे ड्रग्ज तस्कर चरस घेऊन जोगेश्वरी पश्चिमेकडे येणार असल्याची माहिती वांद्रे युनिटला मिळाली होती. त्यानुसार पथकाने  सदर ठिकाणी सापळा रचला होता. मिळालेल्या माहितीनुसार दोन इसम तेथे येताच पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली. दोघांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ एक किलो 15 ग्रॅम वजनाचा चरस साठा मिळून आला. अटक केलेले दोघे ड्रग्ज तस्कर मुंबई शहर व उपनगरात मोठय़ा प्रमाणात पुरवठा करीत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. जप्त केलेला उच्च प्रतीचा चरस साठा आरोपींनी कुठून आणला होता, याचा वांद्रे युनिटचे पथक शोध घेत आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी गुन्हे शाखेच्या युनिट-3 च्या पथकाने नॉर्थ दिल्लीत जाऊन एका ड्रग्ज माफियाला 95 लाख किमतीच्या चरस साठय़ासह रंगेहाथ पकडले होते.