चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या निम्म्याने घटली! 35 टक्क्यांचे प्रमाण 18 टक्क्यांवर

मुंबईत पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण निम्म्याने कमी झाले आहे. हे प्रमाण 35 टक्क्यांवरून 18 टक्क्यांवर आले आहे. अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ही माहिती दिली. जास्तीत जास्त रुग्ण आणि क्लोज काँटॅक्ट शोधून कार्यवाही केल्यामुळे कोरोना लवकरच नियंत्रणात आणण्यास मदत होणार असल्याचेही काकाणी म्हणाले.

मुंबईत महिनाभरापूर्वी दैनंदिन चाचण्यांचे प्रमाण चार ते साडेचार हजार होते. यामध्ये एक हजार ते दीड हजार पॉझिटिव्ह रुग्ण आढळत होते. मात्र आता चाचण्यांचे प्रमाण दहा हजारांवर गेले असतान सुमारे 2000 हजार ते 2200 कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. पालिकेच्या माध्यमातून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ राबवताना घरोघरी तपासणी, सर्वेक्षण यामध्ये जास्तीत जास्त रुग्ण आणि क्लोज काँटॅक्टचा शोधू घेऊन कार्यवाही केली जात आहे. यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचे अतिरिक्त आयुक्त काकाणी म्हणाले.

सणांमध्ये पालिकेचे आव्हान वाढणार

मुंबईत ऑगस्टमध्ये दैनंदिन रुग्णसंख्या तब्बल एक हजारांपर्यंत खाली आली होती. मात्र गणेशोत्सवात वाढलेल्या गाठीभेटी, अनलॉक प्रक्रियेत नागरिकांचा बेजबाबदारपणा यामुळेही लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. यातच आता नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी आणि त्यानंतर ख्रिसमस-नव वर्ष स्वागत यामध्येही लागण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी सणांमध्ये रुग्णवाढ रोखण्याचे आव्हान पालिकेसमोर राहणार आहे.

अशी आहे स्थिती

मुंबईत 20 सप्टेंबरपर्यंत 10 लाख 4 हजार 17 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 1 लाख 84 हजार 313 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. मात्र यातील 1 लाख 47 हजार 807 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत 27 हजार 664 सक्रिय रुइण आहेत. मुंबईत आतापर्यंत कोरोना मृत्यूंची संख्या 8466 इतकी आहे.

जम्बो कोविड सेंटरमधील खाटा वाढवणार

रुग्णवाढ होत असली तरी यातील 80 टक्क्यांहून जास्त रुग्णांनामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून एनएससीआय वरळी डोम, रिचर्डसन क्रुडास भायखळा, महालक्षमी, बीकेसी, गोरेगाव, दहिसर चेकनाका, दहिसर कांदरपाडा या ठिकाणच्या कोविड सेंटरमध्ये सुमारे पाचशे खाटा वाढवण्यासाठी यंत्रणा तयार ठेवणार असल्याची माहितीही काकाणी यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या