
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या एका वक्तव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर लातूरकरांच्या अस्मितेला शरण जाण्याची वेळ आली! आमचा लढा काँग्रेससोबत असला तरी विलासराव देशमुख यांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर असल्याचे फडणवीस म्हणाले. एवढेच नाही तर काँग्रेसचे निष्ठावंत पाईक असलेले शिवराज पाटील चाकूरकर यांचे स्मारक सरकारी खर्चातून उभारण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.
दोन दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातुरात येऊन ‘भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील यात कोणतीही शंका नाही’ असे भयंकर विधान केले होते. रवींद्र चव्हाणांच्या या विधानामुळे लातूरकरांच्या अस्मितेलाच ठेच पोहोचली. विलासराव देशमुख हे लातूरकरांचे श्रद्धास्थान. पण या श्रद्धास्थानावरच चव्हाणांनी लत्ताप्रहार केल्याने संतापाची लाट उसळली. लातूरमध्ये केलेल्या वक्तव्याचे राज्यात पडसाद उमटण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने रवींद्र चव्हाण यांचे कान उपटले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे त्यांनी सपशेल लोटांगण घालत माफी मागितली.
ज्यांचा द्वेष, त्यांचीच स्तुती करण्याची नामुष्की
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विधानाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांच्या सभेतही पडसाद उमटले. चव्हाणांच्या विधानामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काँग्रेसची स्तुती करण्याची वेळ आली. लातूरकरांच्या अस्मितेपुढे फडणविसांनी सपशेल शरणागती पत्करली. आमचा लढा काँग्रेससोबत असला तरी विलासराव देशमुख यांच्याबद्दल नितांत आदर असल्याचे ते म्हणाले. लातूर ही नेतृत्व देणारी भूमी आहे. नगराध्यक्ष ते लोकसभेचे अध्यक्ष, देशाचे गृहमंत्री अशी मानाची पदे शिवराज पाटील चाकूरकर यांनी भूषवली. शिवाजीराव पाटील निलंगेकर, विलासराव देशमुख यांच्या कर्तृत्वाकडे पक्षातीत भूमिकेतून पाहिले पाहिजे. राज्याच्या जडणघडणीत ज्यांचा वाटा आहे, त्यात ही नावे आहेत, असेही फडणवीस म्हणाले. दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचीही आठवण मुख्यमंत्र्यांनी जागवली. शिवराज पाटील चाकूरकर यांचे स्मारक महानगरपालिकेच्या निधीतून न उभारता राज्य शासनाच्या निधीतून उभारले जाईल, तसा प्रस्ताव पाठवावा, असेही त्यांनी सांगितले.
या वेळी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार रमेश कराड, आमदार अभिमन्यू पवार, डॉ.अर्चना पाटील चाकूरकर, पाशा पटेल, माजी खासदार सुधाकर शृंगारे, सुनील गायकवाड आदी उपस्थित होते.

































































