कोल्हापूर जिल्हा झाला ‘शिवमय’!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची 394वी जयंती जिह्यात मोठय़ा उत्साहात आणि सामाजिक उपक्रमांतून साजरी करण्यात आली. शिवपदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक स्थळापासून शिवज्योत घेऊन जाणारे शिवप्रेमी, भगवे झेंडे, पताका, चौकाचौकात दणाणणारे पोवाडे, भव्य पुतळे आणि मिरवणुकांमुळे अवघा जिल्हा शिवमय झाला होता.

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून पन्हाळा, भुदरगड, पारगड, विशाळगड आदी किल्ल्यांवरून शिवज्योत घेऊन जाण्यासाठी जिह्याबाहेरून हजारो शिवप्रेमी मंडळांनी गर्दी केली होती.

आज सकाळी नर्सरी बागेतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात छत्रपती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शाही परिवाराच्या उपस्थितीत शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला. युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती तसेच यशराजे यांच्या हस्ते पाळणापूजन करण्यात आले. तर ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, आयुक्त के. मंजुलक्ष्मी, व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार आदी उपस्थित होते.

कागल ः छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मुरगूड शहर शिवमय झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजा, शिवतीर्थावर गड- किल्ल्यांवरून आलेल्या तरुण मंडळाच्या मशाली, बालचमूनी काढलेली छत्रपती प्रभात फेरी, शाहिरी पोवाडय़ांनी भारलेले वातावरण आणि तरुणाईच्या अमाप उत्साहात शिवजयंती उत्सव साजरा झाला.