भाजप सरकारला सत्तेतून हाकलण्याची जनता वाट बघतेय – अशोक चव्हाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । राहुरी

देशाबरोबरच राज्यातील भाजप सरकारचे साडेचार वर्षातील चुकीचे धोरण पाहता सरकारला सत्तेतून हाकलण्याची जनता वाट पाहत आहे, असे सांगत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. काँग्रेसची संघर्ष यात्रा मंगळवारी दुपारी राहुरी शहरात दाखल होताच फटाक्यांच्या आतषबाजीत यात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी राहुरी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रावसाहेब यादवराव तनपुरे यांनी अशोक चव्हाण तसेच माजी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे स्वागत केले.

अशोक चव्हाण म्हणाले की राज्यातील जनतेने सत्तारूढ सरकारचा कारभार अनुभवला आहे. या काळात सामान्य माणसांना महागाईची झळ पोहचल्याने या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी काँग्रेसची संघर्ष यात्रा काढण्यात येत आहे. राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे कृषीप्रधान असलेल्या पश्चिम महाराष्ट्राची वाताहत झाल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यात निर्माण झालेल्या समस्या सोडवण्याची सरकारची इच्छा नाही. जिल्ह्यात 15 हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र, जातीयवाद पसरवून मते मिळविण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. या सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवहन त्यांनी केले.या यात्रेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांची गैरहजेरी अनेकांना खटकली. ते आजारी असल्याने आले नसल्याचे सांगण्यात आले. हा आजार राजकीय नसल्याचे चव्हाण यांनी सांगताच सभेत हास्यकल्लोळ झाला.

माजी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले सरकारच्या कारभाराने सर्वसामान्य माणूस त्रासला आहे. शेतीमालाला भाव नाही, कर्जमाफी फक्त कागदोपत्रीच झाली. ऊसाला भाव नाही असे अनेक प्रश्न राज्यात निर्माण झाले आहेत. काही उद्योगपतींनाच भाजपच्या काळात अच्छे दिन आले. देशाला बुडवून परदेशात पळून गेलेले सुखी झाले.मात्र, राज्य व देशातील जनता अडचणीत सापडली आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेस समर्थ असल्याचे सांगण्यासाठी राज्यात संघर्ष यात्रा सुरू केल्याचे थोरात म्हणाले.