
चेन्नईतील कॉग्निझंट या आयटी कंपनीमध्ये इंटर्नशिपसाठी गेलेली महाराष्ट्रातील तीन मुले तेथील समुद्रात बुडल्याचे समोर आले आहे. यातील एका तरुणाला वाचवण्यात बचाव पथकाला यश आले आहे. तर मयुरी चौधरी या तरुणीचा मृतदेह सापडला आहे. आणखी एका तरुणाचा सध्या शोध सुरू आहे.
कॉग्निझंटमध्ये इंटर्नशिप करणारा 26 तरुणांचा ग्रुप हा शनिवारी सुट्टी असल्याने चेन्नईतील पाँडेचरी रोडवर असलेल्या समुद्रकिनारी फिरायला गेले होते. त्यावेळी उधाण आलेल्या समुद्रात सेल्फी काढण्यासाठी तिघे जण गेले होते. त्यावेळी एका मोठ्या लाटेसरशी ते तिघे पाण्यात खेचले गेले. त्यानंतर त्यांच्या सोबत असलेल्यांनी बचाव पथकाला बोलावलं. त्यात राज केदारी या तरुणाला वाचवण्यात पथकाला यश आलं.
या दुर्घटनेत भंडारा जिल्ह्यातील वरठी गावच्या मयुरी चौधरी हिचा मृत्यू झाला आहे. तर जळगाव येथील जय पाटील हा तरुण बेपत्ता आहे.

























































