
सामना ऑनलाईन, मुंबई
हिंदुस्थानी शरीरसौष्ठवाची ताकद अवघ्या जगाला दाखवणाऱ्या चेतन पाठारे यांनी इतिहास रचला. जागतिक शरीरसौष्ठव महासंघावर प्रथमच तिरंगा फडकला असून हिंदुस्थानी शरीरसौष्ठव महासंघाचे सरचिटणीस असलेल्या पाठारे यांची जागतिक शरीरसौष्ठव आणि फिजिक स्पोर्टस् महासंघाच्या (डब्ल्यूबीपीएफ) सरचिटणीसपदी निवड करण्यात आली.जागतिक शरीरसौष्ठवाच्या इतिहासात प्रथमच हिंदुस्थानी संघटकाची सरचिटणीसपदी निवड झाल्याची अभिमानास्पद गोष्ट घडली आहे.
डब्ल्यूबीपीएफचे अध्यक्ष बुलात मर्गीलियेव्ह यांनी वैयक्तिक कारणांमुळे नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर झालेल्या निवडणूकीमध्ये पॉल चुआ यांची अध्यक्षपदी तर चेतन पाठारे यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. गेली चार वर्षे डब्ल्यूबीपीएफचे संयुक्त सचिव असलेले पाठारे आता पुढील चार वर्षांसाठी जागतिक महासंघाच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी सांभाळतील.
2011 सालापासून हिंदुस्थानी शरीरसौष्ठव महासंघाच्या सरचिटणीसपदाची धुरा सांभाळणाऱ्या चेतन पाठारे यांनी गेल्या आठ वर्षांत हिंदुस्थानी शरीरसौष्ठवाचा चेहरामोहरा बदलण्याचा करिष्मा करून दाखविला आहे. एवढेच नव्हे तर हिंदुस्थानी शरीरसौष्ठवपटू सुवर्ण पदके जिंकून आपली ताकदही अवघ्या जगाला दाखवून देत आहेत.































































