
कसोटी क्रिकेटमधील टीम इंडियाचा हुकूमी एक्का चेतेश्वर पुजाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत त्याने निवृत्तीची माहिती दिली. टीम इंडियाचा The Great Wall म्हटलं की राहूल द्रविडच्या नावाचा उल्लेख केला जातो. परंतु त्याच्या निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला टीम इंडियाचा The Great Wall 2.0 या नावाने ओळखलं जाऊ लागलं. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने धावांचा डोंगर उभा केला आणि अनेक विक्रमही प्रस्थापित केले. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीमध्ये तीन असे विक्रम केले आहेत, जे मोडित काढणं अशक्य आहे.
चेतेश्वर पुजाराने आपल्या कसोटी कारकिर्दीमध्ये गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला आहे. त्यामुळेच चेतेश्वर पुजारा असा एकमेव फलंदाज आहे ज्याने कसोटी सामन्याच्या एकाच डावात 500 हून अधिक चेंडूंचा सामना केला आहे. 2017 साली रांचीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने पहिल्या डावात 525 चेंडूंचा सामना करत 202 धावा केल्या होत्या. हा एक विक्रम आहे, जो फक्त चेतेश्वर पुजाराच्या नावावर आहे. याबाबतीत दुसऱ्या क्रमांकावर राहुल द्रवीडचा समावेश असून त्याने 495 चेंडू एकाच डावात खेळले आहेत. त्यानंतर चेतेश्वर पुजाराचा दुसरा असा विक्रम जो मोडणं जवळपास अशक्यच आहे. कारण कसोटी सामन्याच्या पाचही दिवस फलंदाजी करण्याची संधी मिळूनही पुजाराने फक्त 75 धावाच केल्या. असा दुर्मिळ विक्रम करणारा तो एकमेव फलंदाज आहे. 2017 साली कोलकाता कसोटीमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळताना त्याने पाचही दिवस फलंदाजी केली. पहिल्या डावात 52 आणि दुसऱ्या डावात फक्त 22 धावा केल्या.
आंतरराष्ट्रीय स्तरासह देशांतर्गत क्रिकेटमध्येही चेतेश्वर पुजाराने दमदार कामगिरी केली आहे. चेतेश्वर पुजारा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 18 द्विशतके झळकावणारा एकमेव हिंदुस्थानी फलंदाज आहे. या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर विजय मर्चंट यांचा समावेश असून त्यांनी 11 द्विशतके झळकावली आहेत. सध्या यंग खेळाडू तोडफोड फटकेबाजीला प्रथम प्राधान्य देतात. त्यामुळे चेतेश्वर पुजाराचे हे तीन विक्रम मोडणं जवळपास अशक्य आहे.