लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीमध्ये सध्या फटाके फुटत आहेत. काही जागांवर उमेदवारांची घोषणा झाली, तर काही जागांचा तिढा अद्यापही कायम आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, रत्नागिरी-सिंधुदुर्गप्रमाणे नाशिक मतदारसंघातही जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भाजप, मिंधे गटासह अजित पवार गटानेही या जागेवर दावा ठोकला आहे. मिंधे गटाकडून हेमंत गोडसे, तर अजित पवार गटाकडून छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत आहे. यावर आता स्वत: भुजबळ यांनीही सूचक विधान केले आहे.
नाशिकच्या उमेदवारीबाबत अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना सूचक विधान केले. दिल्लीमध्ये झालेल्या महायुतीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीमध्ये माझ्या नावाची चर्चा झाली. भुजबळांनी नाशिकमधून उभे रहावे असे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत मी देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा केली असून त्यांनीही दिल्लीतील चर्चा खरी असल्याचे सांगितले. वरिष्ठांकडून तसा प्रस्ताव आल्याचेही त्यांनी सांगितले, असे भुजबळ म्हणाले.
हा फक्त ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है; रोहित पवार यांचे सूचक विधान
ते पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणूक लढायची म्हणजे दोन-पाच महिन्यांपासून तयारी हवी. पण अचानक नाव आल्याने चाचपणी सुरू केली असून अजित दादांशीही संवाद साधला आहे. शिंदे गटाचे हेमंत गोडसे येथून तिकीटासाठी आग्रही आहेत. मात्र महायुतीने उमेदवारी दिल्यास मी नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढणार आणि राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरच लढणार, असेही त्यांनी स्पष्ट केले. नाशिकमधून आता भुजबळांनीही बाह्या सरसावल्याने मिंधे गटाची चांगलीच तंतरली आहे.
View this post on Instagram