
ओबीसी समाजाच्या आरक्षणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडीवर आरोप करून समाजाची दिशाभूल करू नये असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. फडणवीस यांनी केंद्र सरकारकडून ओबीसींचा इम्पिरियल डाटा घेऊन यावा. त्यांनी समाजाचे नेतृत्व करावे, सर्व श्रेय त्यांनी घ्यावे; पण आमचे आरक्षण वाचवावे, असा खोचक टोलाही भुजबळ यांनी लगाविला.
लोणावळ्यात सुरू असलेल्या ओबीसी व्हीजेएनटी न्याय हक्क समितीच्या चिंतन शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी भुजबळ बोलत होते. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, माणिकराव ठाकरे, बबनराव ढाकणे, नारायण मुंडे, बाळासाहेब सानप, ईश्वर बाळबुधे, अरुण खरमाटे, साधना राठोड आदी नेते उपस्थित होते.
एकत्र येऊन लढाई लढली पाहिजे – विजय वडेट्टीवार
एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून हा प्रश्न सुटणार नाही. यासाठी सर्वजण एकत्र आल्यास ओबीसीचा प्रश्न चुटकीसरशी सुटेल. प्रत्येकाने आपापल्या पक्षांचे राजकीय विचार व झूल बाजूला ठेवून एकत्र येत सामाजिक व न्यायालयीन लढाई लढली पाहिजे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
























































