
‘माझ्या हातात सत्ता द्या, तीन महिन्यांत दररोज पाणी देतो!’ असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. आता सहा महिने उलटून गेले. दररोज पाणी तर मिळतच नाही, पण केव्हा येईल याचाही नेम नाही. रात्री-बेरात्री पाण्यासाठी धावाधाव करणार्या छत्रपती संभाजीनगरकरांनी ‘मुख्यमंत्रीसाहेब, तुमचा शब्द कधी पूर्ण करता? पाणी कधी देता?’ असा सवाल केला आहे.
शहरासाठी राबविण्यात येत असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेतून पहिल्या टप्प्यात २०० एमएलडी पाणी ऑक्टोबरमध्येच देण्याचे प्रस्तावित होते. मात्र २३ ऑगस्ट २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फारोळा येथील जलपूजन कार्यक्रमामध्ये ऑक्टोबरऐवजी डिसेंबरमध्ये २०० एमएलडी पाणी दिले जाणार असून मार्चपर्यंत योजनेचे काम पूर्ण केले जाणार असल्याचे सांगितले होते. मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार डिसेंबर गेला. नव्या वर्षात तरी पाणी मिळणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहराला पाणीपुरवठा करणार्या ५६ एमएलडी पाणी योजनेचे पुनरुज्जीवन करून ७५ एमएलडी क्षमतेची नऊशे मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली. या जलवाहिनीतून पाणीपुरवठा करण्यासाठी फारोळा येथे उभारण्यात आलेल्या २६ एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्रही उभारण्यात आले. त्याचे जलपूजन करून मुख्यमंत्री मोकळे झाले. पण शहराच्या नशिबी असलेला पाण्याचा वनवास काही संपला नाही. उलट आता केव्हा पाणी येईल याचा नेमच राहिला नाही. रात्री-अपरात्री केव्हाही पाणी येते. लोक कामावर गेल्यानंतर भरदुपारी पाणी सोडणारी ही जगातील एकमेव महापालिका आहे.
जीवन प्राधिकरणाचा अजगर हलतच नाही
नवीन पाणीपुरवठा योजनेतून २०० एमएलडी पाणी देण्याचा पहिला टप्पा गेल्या ऑक्टोबरमध्येच सुरू करण्याचे आदेश खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच जीवन प्राधिकरणला दिले होते. राष्ट्रीय महामार्गात पाईपलाईन टाकणार्या जीवन प्राधिकरणचा अजगर हलतच नाही. जॅकवेलच्या पहिल्या टप्प्याचे कामही अजून पूर्णत्वाला गेलेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीच ऑक्टोबरमध्ये नाही, पण डिसेंबरमध्ये नक्की वाढीव पाणी देतो, असा शब्द दिला. पण मुख्यमंत्र्यांचे वचनही पाण्यावरच्या बुडबुड्यासारखे विरून गेले.
८२२ कोटींचे कर्ज बोकांडी बसले
दररोज पाणी सोडा, पण निदान दोन दिवसांआड तरी पाणी मिळणार की नाही, याचीही शाश्वती नसताना शहराच्या बोकांडी मात्र ८२२ कोटींचे कर्ज थोपण्यात आले. सुरुवातीला साडेसहाशे कोटींची असलेली ही योजना आता २७४० कोटींवर गेली आहे. योजना पूर्ण करण्यासाठी महापालिकेला भराव्या लागणार्या ८२२ कोटींच्या हिश्श्यासाठी हुडकोने कर्ज मंजूर केले आहे. पाणी केव्हा मिळेल, याबद्दल संभ्रम असताना हे कर्ज मात्र शहराच्या माथी मारण्यात आले.
बावनकुळेंनी मुख्यमंत्र्यांना तोंडघशी पाडले
ऐन मनपाच्या निवडणूकीच्या तोडांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराला तीन महिन्यात पाणी देणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु, महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी परवाच मुख्यमंत्र्यांना तोंडघशी पाडत शहराला वर्षभरानंतरच पाणी मिळणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
































































