
सामना ऑनलाईन । रायपूर
निवडणूक प्रचारादरम्यान नेत्यांकडून आणि मंत्र्याकडून दर्जा सोडून टीका करण्यासोबतच मतदारांना धमकी देण्याचे प्रकार घडत आहेत. निवडणूक आयोग अशा घटनांची गंभीरतेने दखल घेत आहे. छत्तीसगडमध्ये एका प्रचारसभेत काँग्रेसचे वाणिज्य आणि उद्योगमंत्री कवासी लखमा यांनी मतदारांना अशीच धमकी देत काँग्रेससला मत देण्याचे आवाहन केले. तुम्ही ईव्हीएमवर काँग्रेसशिवाय इतर पक्षाचे बटन दाबल्यास तुम्हाला वीजेचा जोरदार धक्का बसेल अशी धमकी त्यांनी मतदारांना दिली आहे. त्यांच्या या विधानाची दखल घेत निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे.
कांकेर जिल्ह्यातील एका प्रचारसभेत लखमा मंगळवारी बोलत होते. ते म्हणाले काँग्रेसचे उमेदवार ब्रिजेश ठाकूर यांना मत देण्यासाठी ईव्हीएममधील पहिले बटन दाबा. त्या बटनाशिवाय तुम्ही दुसरे बटन दाबल्यास तुम्हाला वीजेचा जोरदार धक्का लागेल. वीजेचा धक्का लागू नये, यासाठी आम्ही पहिले बटन निश्चित केले आहे. त्याव्यतिरिक्त इतर बटन दाबल्यास वीजेचा धक्का बसणार हे नक्की आहे. त्यामुळे तुम्ही काँग्रेससमोरचेच बटना दाबा अशी धमकी लखमा यांनी प्रचारसभेत मतदारांना दिली. भाजप पदाधिकाऱ्याने लखमा यांच्या या वक्तव्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली. त्यानंतर निवडणूक आयोगाने लखमी यांना नोटीस बजावत याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. सर्व राजकीय पक्षांनी लखमा यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत मतदारांना धमकी दिल्याबाबत आक्षेप नोंदवला आहे.
























































