पंतप्रधान मोदीजी, मी तुमच्यासाठी मृत्युंजय जप करतो, मुख्यमंत्री चन्नी यांचा जबरदस्त टोला, सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही कसर नसल्याचा पुन्हा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही कसर नव्हती. त्यांना कोणता धोका होता हेच मला कळले नाही. त्यांच्या जिवाला धोका असेल तर मी त्यांच्यासाठी महामृत्युंजय जप करतो, असा जबरदस्त टोला पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी यांनी लगावला.

पंजाब दौऱ्यात शेतकरी आंदोलक अचानक समोर आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काफिला 20 मिनिटे उड्डाणपुलावर अडकून पडला होता. आंदोलक अचानक कसे काय आले, असा प्रश्न करत भाजपने पंजाब पोलिसांनी पंतप्रधानांच्या दौऱ्यात कसर ठेवली असा आरोप केला, तर पंजाब सरकारने पंतप्रधानांचा काफिला अचानक या रस्त्याने वळला आणि त्याची माहिती देण्यात आली नाही असा खुलासा केला आहे.

आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात सुरक्षेची कोणतीही कसर नव्हती, असा दावा करून पंतप्रधानांच्या जिवाला धोका असेल तर मी त्यांच्यासाठी महामृत्युंजय जप करतो, असा टोलाही त्यांनी लगावला.