सर्जा–राजावरील बळीराजाचे प्रेमच जिंकले! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उद्गार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे आपल्या पशुधनाची जीवापाड सांभाळ करणाऱया शेतकऱयांचे म्हणजे बळीराजाचे आपल्या सर्जा-राजावरील प्रेम जिंकले, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपली संस्कृती आणि परंपरा टिकवून ठेवणाऱया या शर्यतीसाठी अखेरपर्यंत चिवटपणे लढा देणाऱया पशुप्रेमींचेही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या अभिनंदन संदेशात म्हणाले, संदेशात बैलगाडा शर्यत ही पशुपालक आणि पशुधनावर जीवापाड प्रेम करणाऱया बळीराजाची पूर्वापार चालत आलेली परंपरा आपल्या संस्कृतीत पशुधनालाही दैवताचे स्थान आहे. यातून पशुधनाचे जतन, संवर्धनाचाही विचार केला गेला आहे. शर्यतींमधून या सगळ्या बाबींना प्रोत्साहन मिळत असे. शर्यंती सुरू व्हाव्यात यासाठी दीर्घ असा आणि चिवटपणे लढा द्यावा लागला. त्यामागेही बळीराजाचे आपल्या पशुधनावरील प्रेमाचे बळच होते. शर्यती असोत किंवा नसोत, आपले पशुपालक या पशुधनाची पोटच्या लेकरांप्रमाणे काळजी घेतात, हे सर्वांनाच माहीत होते. आता शर्यती सुरू होतील, त्यामधून आपल्या लोकपरंपरेचे आणि पशुधनाची वैभवही सगळ्यांना पाहता येईल. शर्यती पुन्हा सुरू व्हाव्यात पण त्यामध्ये गैरप्रकार आणि पशुधनाचा कदापीही छळ होऊ नये. त्याबाबत घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन केले जावे, असे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.