
दोन वर्षांपूर्वी जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना या संसर्गजन्य आजाराचं सावट पुन्हा एकदा जाणवू लागलं आहे. चीनमध्ये ओमायक्रॉनचा एक व्हेरियंट असलेल्या बीएफ 7चे अनेक रुग्ण आढळल्याने लॉकडाऊन करण्यात आलं आहे. याच व्हेरियंटचा एक रुग्ण गुजरातच्या बडोद्यात आढळल्याचं वृत्त आहे. एक अनिवासी हिंदुस्थानी महिला या व्हेरियंटने संक्रमित असल्याचं आढळलं आहे.
त्यासोबतच गुजरातमध्ये अजून दोन असे रुग्ण आढळले आहेत, जे बीएफ7 चे संशयित रुग्ण असल्याचं बोललं जात आहे. मात्र, अद्याप या दोन रुग्णांबाबत पुष्टी करण्यात आलेली नसून त्यांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. वास्तविक यापूर्वीही याच व्हेरियंटचे अनेक रुग्ण हिंदुस्थानात आढळले होते. मात्र, या वेळी याच व्हेरियंटने चीनमध्ये थैमान घातलं असून त्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन सतर्क झालं आहे.
बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी एक बैठक बोलवली होती. या बैठकीत नीति आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी या व्हेरियंटमुळे घाबरून जाण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. दर आठवड्याला आरोग्य मंत्रालयात कोरोनासंबंधित समीक्षा बैठका होतील. देशात कोरोना तपासण्या योग्य संख्येत होतील. तसंच या बैठकांमध्ये त्याचा आढावा घेऊन आरोग्य मंत्रालय योग्य ती पावलं उचलेल, असंही या बैठकीत ठरवण्यात आलं. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी मास्कचा वापर करावा तसंच गरज वाटल्यास बुस्टर डोस घ्यावा असं आवाहन पॉल यांनी केलं आहे.
























































