
चायना पीआर संघाने गुरुवारी एएफसी वुमन्स आशिया कप भारत 2022 फुटबॉल स्पर्धेत सर्वात सनसनाटी निकालाची नोंद करताना गतविजेत्या जपानचे आव्हान नियोजित आणि अतिरिक्त वेळेतील बरोबरीनंतर पेनल्टी शूट आऊटमध्ये 4-3 गोलने संपुष्टात आणत अंतिम फेरीत प्रवेश केला.
म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील मैदानावर झालेला उपांत्य फेरीचा सामना कमालीचा रंगला. अतिरिक्त वेळेनंतरही सामना 2-2 अशा बरोबरीत राहिला. त्यानंतर झालेल्या पेनल्टी शूट आऊटमध्ये चायना पीआर संघाने बाजी मारली. गोलरक्षक यु झु आणि कर्णधार वँग शानशान त्यांच्या विजयाच्या शिल्पकार ठरल्या. चायना पीआर संघ आता नवव्या विजेतेपदापासून केवळ एक सामना दूर आहेत. जपान मात्र विजेतेपदाच्या हॅटट्रिकपासून वंचित राहिले.
जपानची सुरवात त्यांच्या लौकिकाप्रमाणे वेगवान झाली. त्यांनी पहिल्याच मिनिटाला हिनाटा मियाझावा हिने चायना पीआर संघाची गोलरक्षक यु झु हिच्या क्षमतेची कसोटी पाहण्यास सुरवात केली. मियाझावा हिच्या लांबवरून आलेल्या किकला अडवताना यु झु हिला आपले सर्वस्व पणाला लावावे लागले. पाठोपाठ जपानच्या रिको युएकी हिला गोल करण्याची सुवर्ण संधी साधता आली नाही. सामन्याच्या चौथ्या मिनिटाला तिची किक बाहेर गेली. जपान आणि युएकीचे धारदार आक्रमण हे सुरवातीच्या खेळाचे आकर्षण ठरले होते. युएकीचा वेग कुठल्याही संघाच्या छातीत धडकी भरवणारा होता. जपानच्या रुका नोरीमात्सु हिने तिला सुरेख पास दिला. सहाव्या मिनिटाला मिळालेली ही संधीही वाया गेली. युएकीची किक गोलरक्षच यु झु हिने शिताफीने अडवली.

























































