
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
मागील स्थायी समितीच्या सभेत चिंचनाका शाळेच्या निर्लेखनाबाबत करण्यात आलेला ठराव वगळून इतिवृत्त मंजूर करण्याचा निर्णय जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरुपा साळवी यांनी घेतला. त्यामुळे या विषयाला पूर्णविराम मिळाला आहे.
गुरुवारी स्थायी समितीची सभा शिवाजी सभागृहात झाली. मागील सभेत चिंचनाका शाळेचा मुद्दा चर्चेला आलेला नसतानाही या शाळेचा निर्लेखनाचा ठराव करण्यात आला होता. चौदावा वित्त आयोग येगाव सामान खरेदीचा प्रस्ताव सरपंचानी केला होता. त्यामध्ये अनियमितता झाल्याची तक्रार असल्यामुळे चौकशीचे आदेश अध्यक्षांनी दिले आहे. त्या अहवालात दोषी आढळल्यास कारवाई करा असे त्यांनी बजावले आहे.
जिल्हा परिषदेचे दर महिन्याला 2 ते अडीच लाखांपर्यंत वीज बील येते. साधारपणे वार्षिक 25 लाख रुपये वीजबिलापोटी खर्च येतात. इमारतीच्या टेरेसवर सौरऊर्जा प्रकल्प राबवून त्याद्वारे ही रक्कम वाचवता येईल. सौरऊर्जेसाठी मिळालेला निधी अन्यत्र वळवू नये, अशी मागणीही यावेळी सर्व सदस्यांनी केली.


























































