
चिपीपाठोपाठ आता रत्नागिरी विमानतळावरूनही प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज झालेल्या विमानतळ प्राधिकरणासोबतच्या बैठकीत याविषयीचे निर्देश दिले. रत्नागिरी विमानतळावरून लवकरात लवकर प्रवासी वाहतूक सुरू व्हावी याकरिता पायाभूत सुविधांकरिता आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. याअनुषंगाने विमानतळाच्या परिसरातील विकासकामांचे सुनियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. रत्नागिरी विमानतळ विकासाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, सामान्य प्रशासन विमानचालन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, विमानचालन संचालनालयाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, तटरक्षक दलाचे अधिकारी आदी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
धावपट्टीची लांबी वाढवणार
रत्नागिरीचे पालकमंत्री अॅड. अनिल परब यांनी पर्यटन व उद्योगवाढीसाठी रत्नागिरी विमानतळ महत्त्वाचे असल्याचे सांगितले. यासाठी रत्नागिरी विमानतळावरील धावपट्टीची लांबी वाढविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विमानतळाजवळ कोस्टगार्डची एक इमारत आहे त्यांना पर्यायी इमारतीत जागा देण्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती बैठकीनंतर अनिल परब यांनी दिली.





























































