
चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथील आकाश लकेश्री यांनी अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या हिमालयीन एक्स्ट्रीम ट्रायथलॉन स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून चिपळूणचे नाव उंचावले आहे. एकूण आठ तास बावन्न मिनिटांत ही आव्हानात्मक स्पर्धा पूर्ण करत त्यांनी पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्रता मिळवली आहे. देशातील फार थोडे खेळाडू एवढ्या कठीण स्पर्धेत उतरतात, त्यात आकाश यांनी मिळवलेले यश उल्लेखनीय मानले जात आहे.
हिमालयीन एक्स्ट्रीम ट्रायथलॉन ही जगातील सर्वाधिक अवघड स्पर्धांपैकी एक मानली जाते. या स्पर्धेत पोहणे, सायकलिंग व धावणे या तीन टप्प्यांचा समावेश असतो. प्रचंड थंड वातावरण, खडतर पर्वतीय मार्ग, कमी ऑक्सिजन आणि तीव्र चढ-उतार यांच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंना आपली शारीरिक व मानसिक क्षमता सिद्ध करावी लागते. या स्पर्धेत आकाश लकेश्री यांनी पोहण्याच्या 2.8 किलोमीटर अंतरासाठी 17 ते 18 अंश तापमानाच्या थंड पाण्यात अवघ्या 53 मिनिटांचा वेळ घेतला. त्यानंतरच्या 88 किलोमीटर सायकलिंग टप्प्यात 2400 मीटर चढाचा सामना करत चार तास 27 मिनिटांत त्यांनी हा टप्पा पूर्ण केला. शेवटचा आणि सर्वात कठीण मानला जाणारा 21 किलोमीटर धावण्याचा टप्पा 1700 मीटर चढासह तीन तास 21 मिनिटांत पूर्ण करत त्यांनी एकूण आठ तास 52 मिनिटांत स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली.
आकाश लकेश्री हे मूळचे खेर्डी येथील असून सध्या ते पुण्यात वास्तव्यास आहेत. 2018 साली त्यांनी स्पोर्ट्स मॅनेजमेंटमधून एमबीए सुरू केले होते; मात्र फी भरण्यासाठी निधीअभावी त्यांनी शिक्षण अर्धवट सोडावे लागले. याच काळात त्यांनी ट्रायथलॉन हा खेळ निवडत आयुष्याला नवे वळण दिले. पुण्यातील दोन प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रशिक्षणास प्रारंभ केला. स्पोर्ट्स मॅनेजमेंट संस्थेत काम करताना त्यांचा सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या संपर्कात येण्याचा योग आला. त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा घेत 2018पासून त्यांनी व्यावसायिक प्रशिक्षणाला गती दिली.
2020मध्ये दुबईमध्ये स्थानिकांच्या मदतीने त्यांनी पहिली मोठी ट्रायथलॉन स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली. लॉकडाऊनच्या काळात ते चिपळूणमध्ये परतले आणि 2021मध्ये रत्नागिरी येथे कोचिंग सुरू केले. त्यानंतर 2022-23 मध्ये पुन्हा पुण्यात स्थलांतर करून त्यांनी क्रीडा प्रशिक्षण सुरू ठेवले. 2024मध्ये त्यांनी ‘स्काय एंडुरन्स क्लब’ या नावाने स्वतःचे कोचिंग सेंटर सुरू केले. आर्थिक पाठबळ नसतानाही त्यांनी स्वतःच्या मेहनतीतून नेपाळमध्ये झालेल्या एक्स्ट्रीम ट्रायथलॉन स्पर्धेत सहभाग नोंदवला आणि ही स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करून या स्पर्धेत भाग घेणारे देशातील पहिले खेळाडू ठरले. आकाश लकेश्री यांच्या या यशामुळे चिपळूणचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक उजळले आहे. आगामी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ते भारताचे प्रतिनिधित्व करणार असून त्यांच्या पुढील प्रवासासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

























































