चिर्ले जवळ कोट्यवधी रूपयाचे रक्त चंदन पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। चिरनेर

चिरनेर येथे मागील दोन वर्षांपासून थंडावलेली रक्तचंदनाची तस्करी पुन्हा सुरू झाली आहे. मंगळवारी उरण तालुक्यातील चिर्ले गावाजवळील वैष्णो कंटेनर यार्ड मध्ये कोट्यवधी रूपये किंमतीचे रक्तचंदन पकडले आहे. राजस्व आसूचना निदेशालय (डिआरआय) ने ही कारवाई केली. या कारवाईत आंतराष्ट्रीय बाजारपेठेत करोडो रूपये किंमत असलेला रक्तचंदनाने भरलेला 40 फुटीचा कंटेनर जप्त केला आहे.

जेएनपीटी परिसर म्हणजे रक्तचंदन तस्करांचा अड्डाच समजला जातो. मात्र गेल्या 2 वर्षापासून रक्तचंदन तस्करी थंडावली होती. उरण पोलिसांनी 2 वर्षापूर्वी रक्त चंदन तस्करी करणाऱ्या 21 आरोपींना अटक केली होती. यामध्ये 4 बडे रक्त चंदन तस्कर होते. त्यांची कोट्यावधी रूपयांची मालमत्ता देखील जप्त केली होती. त्यामुळे या रक्त चंदन तस्करांचे कंबरडेच मोडले होते. आत्ता परत एकदा हे रक्त चंदन तस्कर सक्रीय झाले असून त्यानी कोट्यावधी रूपयांची माया जमवून देणारी रक्त चंदन तस्करी सुरू केली आहे.

मुंबई डिआरआयने मंगळवा संध्याकाळी चिर्ले येथील वैष्णो या कंटेनर यार्डवर छापा मारून रक्त चंदनाने भरलेला 40 फुटीचा कंटेनर जप्त केला. जीईएसयु-4388497 असा कंटेनर क्रमांक असून तो वाहून नेणारा ट्रेलर क्रमांक एमएच-43 ई-8058 हा जप्त केला आहे. जवळ जवळ 30 ते 40 टन रक्तचंदन यामध्ये असल्याचे बोलले जाते. आंतराष्ट्रीय बाजारपेठेत या रक्तचंदनाची कोट्यावधी रूपये किंमत आहे. मात्र हे रक्त चंदन नेमके कुठून येथे आणले होते व ते कुठे नेण्यात येत होते याबाबत माहिती मिळालेली नाही. काही वेळेला डीआरआय आणि सीमाशुल्क विभागाने जप्त केलेले रक्तचंदनाचे कंटेनर देखील या तस्करांनी चोरून नेल्याच्या घटना घडला आहेत. दोन वर्षापूर्वी अशाच सीमाशुल्क विभागाने जप्त केलेला कंटेनर चोरल्याबाबत 21 आरोपींना अटक करण्यात आली होती. याबाबत डिआरआयच्या जेएनपीटी पीयुबी कार्यालयातून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता मुंबई कार्यालयातून अधिकृत माहिती घेण्यास सांगितले. मात्र या रक्त चंदन तस्करीच्या प्रकरणानंतर पुन्हा एकदा जेएनपीटी परिसरात रक्त चंदन तस्करांनी डोके वर काढले असल्याचे बोलले जाते.

summary-chirner-chandan-smuggling-going-on