आपला माणूस- आनंदयात्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> चित्रा प्रभाकर

कधी कधी काही ईश्वरी संकेत मिळून आपण ठराविक ठिकाणी पोहोचतो आणि खरंच आपल्याला तिथे एक खजिनाच सापडतो. हा खजिना दर वेळी धन-संपत्तीचाच असेल असं नाही, तर मेहनत, चिकाटी, कला, गुण यांनी लखलखलेला एखादा ‘आपला माणूस’ही असू शकतो. तो आहे केशव शेणॉय… एक आनंदयात्री!

स्वातंत्र्यसेनानी व्यंकटेश अप्पा शेणाय व पत्नी सुनीता शेणाय 1947च्या काळात लोअर परेल विभागात समाजसेवेत कार्यरत होते. त्यांचा मुलगा केशव शेणाय हे एक आनंद यात्री. आई-वडिलांकडून समाजसेवा व सामाजिक ऋण परतफेडीचं बाळकडूच केशवसरांना मिळालं. लहानपणी घरातच त्यांच्यावर वडिलांच्या उदाहरणामुळे सामाजिक कार्याचे संस्कार झाले.
आईचा त्याग आणि वडिलांना दिलेला खंबीर पाठिंबाही त्यांनी जवळून पाहिला.

शाळा आणि विद्यापीठीय पुस्तकी शिक्षणानंतर सरांनी आपल्याच कौटुंबिक पारंपरिक व्यवसायात प्रवेश केला व स्वत:चे ‘शेणाय कँटीन’ चालवायला घेतले. यशस्वीपणे हा व्यवसाय संभाळत असताना आजूबाजूच्या गांधीनगर परिसरात काय चालले आहे हे वास्तवही त्यांनी जवळून पाहिले आणि त्याबरोबरच त्यांनी तेथे असणाऱया रहिवाशांच्या अडचणी सोडवायला सुरुवात केली. फुटपाथवरील अपामण असो की समाजकंटकांनी वसवलेल्या अनधिकृत झोपडय़ा असो किंवा स्थानिक रहिवाशांचे प्रश्न असो, या सर्व समस्या कायमस्वरूपी सोडवून त्यांना योग्य दिशा देण्यात आली व परिसराचे सुशोभिकरण करण्यात आले. पारंपरिक व्यवसाय करत असतानाच काही आजारपणामुळे ‘सर’ योगाभ्यास व आयुर्वेदाकडे वळले आणि इथूनच त्यांच्या आयुष्याला एक नवीन वळण मिळाले.

आता ‘योग’च सरांच्या आयुष्याचा एक अविर्भाज्य भाग बनला आहे. सतत 20-22 वर्षे योगाभ्यासाच्या अनुभवाने ते आज एक निपुण योग शिक्षक आहेत. आपल्या योगाभ्यासाच्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी अनेक संस्थांना, सामाजिक संस्थांना, पोलीस कर्मचाऱयांना, ज्येष्ठ नागरिकांना अंधविद्यार्थ्यांना आपल्या विनामूल्य सेवेने दिला आहे.

2014 रोजी सरांनी ‘युज’ फिटनेस स्टुडिओ सुरू केला. इथे त्यांचे योगाभ्यासाचे वर्ग आजही चालतात. या वर्गातील काही विद्यार्थी आणि ‘सर’ गेले काही वर्षे दर शनिवारी स. 6.30 ला ‘मार्निंग वाक’ला बाहेर पडतात आणि ही मंडळी मुंबईतील फारशा माहीत नसलेल्या ठिकाणांना उदा. माथारपाखाडी, खोताची वाडी, बाणगंगा यासारख्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या व शिवडी येथील बर्ड सँक्च्युरी, मुंबईतील समुद्र किनारे इ. ठिकाणी भेट देणे ही या मार्निंग वाकची खासीयत आहे.

सरांच्या लाडक्या बहिणीचे- जिला गाण्याची प्रचंड आवड होती- अकस्मात निधन झाले आणि तिच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांनी ‘सूर बांसुरी’ हा कराओके ग्रुप सुरू केला आणि स्वत:बरोबर इतरांमधे लपलेल्या कलाकाराला मुक्तपणे गायची संधी दिली. हा सूर बांसुरी ग्रुप आणि युज स्टुडिओ, शेणाय कँटीनच्याच एका विभागामध्ये चालवला जातो. महिन्याच्या प्रत्येक शनिवार, रविवार ही गाण्यांची मैफील इथे जमते आणि ही मैफीलही विनामूल्य आहे.

गाण्याची आवड असलेला कोणीही येथे येऊन मनमोकळं गाऊ शकतो आणि स्वत:मधला कलाकार जिवंत ठेवू शकतो. या मैफिलीत सामील व्हायला वयाची अट नाही. महिन्याच्या शेवटी एक खास इव्हेंट आयोजित केला जातो. या इव्हेंटस्ना थीम ठेवली जाते. कधी किशोर कुमार, कधी रफी, मदन मोहन, शाहरुख, अमिताभ-रेखा इ. कलाकारांचे, संगीतकारांचे जन्मदिवस तर कधी बरसात, कधी नये-पुराने गीत अशा विविध विषयांना घेऊन या थीम असतात. कधी उत्स्फूर्त सुचलेली अंताक्षरी असते, कधी गाण्यांची प्रथम अक्षरे देउढन ती गाणी ओळखून गाणी म्हणा अशीही धमाल करण्यात येते. यावेळी कोणाला सूत्र संचालन करायला मिळते, तर कोणी नृत्य सादर करतो तर कोणी वेशभूषा करून गाणं सादर करू शकतो. तर कोणी अभिनय करून. स्वातंत्र्य दिन, होळी, दिवाळी, नवरात्री हे सणही या मैफिलीत ‘थीम’ रूपात साजरे केले जातात.

प्रत्येक माणसात लपलेल्या आणि विस्मृतीत गेलेल्या बालपणाला येथे मनमुराद बागडायला मिळते. या सर्व मैफिली दर शनिवार, रविवार आणि खास इव्हेंटस् याचं व्हिडीओ शूटिंगही केशवसर करतात आणि त्याच रात्री ते तुमच्यापर्यंत पोहोचवतातही. ज्यामुळे तुम्ही ते बघून ऐकून स्वत:मध्ये सुधारणा घडवू शकता.

‘सूर बांसुरी’मध्ये सामील होणाऱया सध्याच्या सर्व गायक-गायिका कलाकारांचे वय 50 च्या पुढे असे आहे. संसारिक जबाबदाऱया संपत आल्या आहेत. निवृत्तीनंतरचं एकटेपण, स्वत:चं मानसिक आरोग्य संभाळणे हे या ग्रुपमध्ये सामील झालं की सहज शक्य होते.

सर सर्वांना तेवढय़ाच उत्साहाने प्रेरित करत राहतात. ते स्वत: उत्तम चित्रकारही आहेत. गाणी, गप्पा, मध्यंतर, चहा, बिस्किटे इत्यादींमधून वेळ मिळाला तर योगाभ्यासातून गाण्यासाठी उपयोगी असणारी साधना किंवा विचार यांचीही देवाण-घेवाण होते.

या मैफिलींमध्ये कित्येकांना स्वत:चा गमावलेला आत्मविश्वास परत गवसला आहे आणि स्वत:मध्ये असलेले सुप्तगुण त्यांचे त्यांनाच कळले आहेत.

“देता किती घेशील… दो कराने”
या ओळीचा अर्थ युज स्टुडिओमध्ये आपल्या सर्वांना गवसतो. केशवसरांचा हा गाण्याचा ग्रुप, वृद्धाश्रम, ज्येष्ठ नागरिक संघ, अनाथालय, मतिमंद मुलांच्या शाळा, अंध मुलांची वर्कशाप्स, वुमन हास्टेल्स अशा विविध ठिकाणी गाण्यांतून चार क्षण विरंगुळय़ाचे या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन विनामूल्य सेवा देतात. सरांच्या आदरणीय मातोश्री सुनीताताईदेखील प्रत्येक मैफील, इव्हेंटस् व सामाजिक कार्यात स्वत: हजर राहून गाण्याचा आनंद लुटतात व सर्वांचे मनोबल वाढवतात. 23 आाक्टोबर रोजी ‘युज स्टुडिओ’तल्या सर्वांच्या आई वयाची 93 वर्षे पूर्ण करत आहेत. त्यांच्या डोळय़ातील कौतुक हे फक्त सरांसाठी नसतं तर प्रत्येकासाठी झिरपत असतं.

खिलते है गुल यहां
खुल के ही गाने को
मिलते है दिल यहां
मिल के गीत सुनने को!

[email protected]