चर्चगेट स्थानकात माकडाचा धुमाकूळ, प्रवाशांची तारांबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चर्चगेट रेल्वे स्थानकात आज दुपारी 2 वाजताच्या सुमारास एका माकडाने धुमाकूळ घातल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. सुरुवातीला खिडकीवर बसलेल्या या माकडाने एक लोकल स्थानकात येताच सैरावैरा धाव घेतल्याने प्रवाशांची घाबरगुंडी उडाली. या घटनेमुळे सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास एक माकड फलाट क्र. 1 च्या किनाऱ्यावर आरामात बसले होते. दुपारच्या वेळेस तुरळक प्रवासी असल्याने प्रवासी या ‘मर्कटलीला’ कुतूहलाने पाहत होते. त्याचवेळी 1.52 वाजता विरारसाठी सुटणारी धिमी ट्रेन स्थानकात शिरली. माकडाचे त्या गाडीकडे लक्ष जाताच फलाटाच्या किनाऱ्यावरून त्याने मागे धाव घेतली. त्याचवेळी त्याच्या जोरदार धक्क्याने बाकडय़ावर बसलेली महिला प्रवासी खाली पडली. तिच्या किंचाळण्याने तेथे उपस्थित असलेल्या प्रवाशांनी तिच्याकडे धाव घेतली, मात्र घाबरलेली ती महिला प्रवासी स्वतःला सावरत उभी राहिली. सुदैवाने ती जखमी झाली नाही. माकडानेही तेथून पळ काढला.

या घटनेच्या धावपळीमुळे ‘एमआरएफ’चा जवान घटनास्थळी दाखल झाला. त्याने माकडाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र माकड दिसल्यानंतर त्याच्याकडे पाहत राहण्याशिवाय तो काहीही करू शकला नाही. दरम्यान, एका महिलेने दिलेल्या माहितीनुसार गेल्या चार दिवसांपासून माकड दररोज येथे येत आहे. अचानक येणाऱ्या या माकडामुळे काही प्रवाशांमध्ये घबराट निर्माण होत असल्यामुळे दुर्घटना घडण्याचीही भीती आहे. त्यामुळे प्रशासनाने या माकडाचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.