जेमिनी शंकरन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

> गणेश उदावंत

सर्कस… या तीन अक्षरांशी ज्यांचा नाद-छंद जुळला, पुढे तो त्यांचा श्वास बनला. असे सर्कस जगतातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणजे मुरक्कुथ वेंगक्पंदी शंकरन उपाख्य जेमिनी शंकरन. हिंदुस्थानी सर्कस व्यवसायाला नवनवीन कल्पना जुळवून ती जनमान्य करण्यात जेमिनी शंकरन यांनी जे कष्ट सोसले, त्याला तोड नाही. त्यांनी वयाच्या 99 व्या वर्षी सर्कशीच्या तंबूतून कायमची ‘एक्झिट’ घेतली, ती मनाला चटका लावणारी आहे.

नैसर्गिक वनसंपदा लाभलेल्या दक्षिणेतील केरळ राज्यात कोलस्सेरी (जि. मलाबार, आताचे कन्नूर) येथे नायर कुटुंबात शंकरन यांचा 13 जून 1924 रोजी जन्म झाला. कुटुंबातील पाचवे अपत्य असणाऱया शंकरन यांना लहानपणापासूनच सर्कस व तेथील कला सादरीकरणाची आवड होती. त्यामुळे त्यांचा हा छंद पुढे सर्कस व्यवसायाच्या पायाभरणीसाठी पूरक ठरला. त्यांचे शिक्षण जेमतेम इयत्ता सातवीपर्यंत झाले. उदरनिर्वाहासाठी त्यांना लहानमोठी कामे करावी लागली. याचदरम्यान ते सैन्यदलात भरती होऊन जोखमीच्या बिनतारी संदेश विभागात नियुक्त झाले. त्याच वेळी जागतिक स्तरावर दुसरे महायुद्ध सुरू होते, पण त्यांना मूळ छंद स्वस्थ बसू देत नव्हता. परिणामी चार-साडेचार वर्षे सैन्यदलात काम करताना ही सेवा सोडून त्यांनी कोलकाता येथील बॉस लॉयन सर्कसमध्ये कलाकार म्हणून श्रीगणेशा केला आणि इथूनच त्यांनी सर्कस इतिहासाचा पाया रचला.

सर्कसमध्ये कलाकाराच्या रूपाने काम पाहणारे शंकरन हे जुने कलाकार. जीवनातील एका टर्निंग पॉइंटवर त्यांनी त्या वेळच्या अवघ्या सहा हजार रुपयांमध्ये विजया सर्कस खरेदी केली. मनोरंजनासोबत आकर्षक कवायती, पशुपक्ष्यांचा दिलखेचक खेळ, कलावंतांच्या डोळय़ांची पारणे फेडणारा कलाविष्कार, सोबतीला जोकर अशा नियोजनबद्धतेतून आधुनिक सामग्रीचा वापर करीत शंकरन यांनी सर्कसला नवी प्रतिष्ठा मिळवून दिली. विजया सर्कसचे नाव बदलून त्यांनी ‘जेमिनी’ असे केले. ही सर्कस देश-विदेशांत प्रसिद्ध झाली. त्यामुळे एम. व्ही. शंकरन यांना ‘जेमिनी शंकरन’ या नावाची नवी ओळख मिळाली, ती शेवटपर्यंत कायम राहिली. याचदरम्यान त्यांनी जम्बो सर्कसची संस्थापना करून सर्कस कलेचा डोलारा वाढविला.

देशातील विविध राज्यांत सर्कसचा तंबू थाटत असताना रशिया व चीनमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय सर्कस महोत्सवात शंकरन् यांनी दमदारपणे सादरीकरण केले. त्यातूनच त्यांची लोकप्रियता वाढली. सर्कसमधील कला-कसरतीचे आकर्षण सिने जगतात कुतूहलाचा विषय ठरणे ही मोलाची बाब. याच आकर्षणातून ‘द ग्रेट शो मॅन’ राज कपूर यांनी ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटात पहिल्याप्रथम ‘जेमिनी’ सर्कसचाच सेट वापरला आणि हा चित्रपटही गाजला. हाच सिलसिला कायम राहिला. बॉलीवूडसोबत टॉलीवूडमध्ये निर्माण झालेल्या अनेक चित्रपटांत प्रासादिक सहकलाकारांचे सर्कसमधील पात्र चित्रित केले होते.

शंकरन यांनी इंडियन सर्कस फेडरेशनचे अध्यक्ष म्हणूनही बरीच वर्षे काम केले. आपल्या सर्कस कला जीवनातील भल्याबुऱया आठवणींवर त्यांनी सन 2012 मध्ये ‘मलक्कम मारियुन जीविथम’ या नावाने आत्मचरित्र प्रकाशित केले. त्यांना पेंद्र शासनाच्या वतीने मानाचा ‘जीवन गौरव पुरस्कार’ही प्राप्त झाला होता. 2019 मध्ये केरळ येथे झालेल्या केरला आर्किटेक्चर फेस्टिव्हलमध्ये शंकरन यांचा सत्कार करीत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला होता. सर्कशीचा व्यापक पसारा आपली मुले अजय व अशोक यांच्याकडे सोपवून ते स्थिरावले होते.

‘कल खेल में, हम हो न हो,
गर्दीश में तारे रहेंगे सदा’

या गाण्यातील तत्त्वज्ञानाप्रमाणे शंकरन यांनी सर्कशीतील आपला वावर थांबवला तो कायमचाच!