
या सरकारचे करायचे काय.. खाली डोके वर पाय’, ‘सरकार हम से डरती है, पोलीस को आगे करती है’ अशा गगनभेदी घोषणा देत आजपासून वाढवण बंदराविरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरू झाले आहे. या आंदोलनामध्ये शेकडो भूमिपुत्र, मच्छीमार, शेतकरी, बागायतदार, डाय मेकर्स यांनी भाग घेतला. भूमिपुत्रांनी अनेकदा विरोध करूनही महाविनाशकारी प्रकल्प केंद्र सरकार त्यांच्या माथी मारत आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला असून त्यांच्या आक्रमक पवित्र्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली आहे.
वाढवण प्रकल्पाच्या सर्व्हिस रोडचे काम तत्काळ बंद करण्यात यावे, तसेच जमावबंदी आदेश रद्द करण्यात यावा इत्यादी मागण्यांसाठी वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती, युवा संघर्ष समिती, नॅशनल फिश वर्कर्स फोरम, ठाणे जिल्हा मध्यवर्ती मच्छीमार संघ, ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघ, महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, कष्टकरी संघटना आणि इतर सहयोगी संघटनेच्या माध्यमातून धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
वाढवण बंदराचे काम सुरू करण्याच्या दृष्टीने वरोर वाढवण समुद्रकिनाऱ्यावर दगडांचा भराव करण्याचे काम सेम इंडिया कंपनी करणार आहे. त्यासाठी वरोर गावाजवळील, चिंचणी डहाणू रस्त्यापासून ते वरोर समुद्रकिनाऱ्यापर्यंत, ग्रीन फिल्ड महामार्ग लगत दीड किलोमीटर लांबीचा आणि सात मीटर रुंदीचा सव्हींस रोड तयार करण्यात येत आहे. त्याला शेतकरी, मच्छीमार, आदिवासी, डायमेकर यांनी जोरदार विरोध केला आहे. विशेष म्हणजे या महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला पूर्णपणे मिळालेला नाही असा आरोप वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीने केला आहे.
पुन्हा आक्रमक पवित्रा
ग्रीनफिल्ड वाढवण बंदर महामार्गालगत तयार करण्यात येणाऱ्या सव्हींस रोडला होणारा विरोध अधिक तीव्र झाला आहे. त्यासाठी वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती पुन्हा एकदा आक्रमक झाली असून धरणे आंदोलन आणखी पेटण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान या बेमुदत धरणे आंदोलनात वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण पाटील, युवा संघर्ष समितीचे अध्यक्ष मिलिंद राऊत, विनीत पाटील, रामकृष्ण तांडेल, मनेंद्र आरेकर, नारायण तांडेल, प्रार्थना विंदे यांच्यासह पंचक्रोशीतील असंख्य नागरिक सहभागी झाले होते.

























































