
उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील एका महिला न्यायाधीशाने हिंदुस्थानचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड़ यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी आपण सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळलो असून आपल्याला इच्छामरणाची परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. या महिला न्यायाधीशाने कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नही उपस्थित केले आहेत.
बांदा जिल्ह्यातील दिवाणी न्यायाधीश सुनीता(बदललेले नाव) यांनी सरन्यायाधीशांना दोन पानी पत्र लिहिले आहे.सुनीता यांनी पत्रात म्हटले आहे की, बाराबंकी न्यायालयात त्यांची नियुक्ती करण्यात आली असून इथे जिल्हा न्यायाधीशांनी आपला अनेक वेळा लैंगिक छळ केला आहे. न्यायाधीश मला रात्री एकटीला भेटायला बोलावतात. त्यांच्या अवास्तव मागण्या आणि लैंगिक छळ या सगळ्याला कंटाळून मी अनेकवेळा न्यायालयात दाद मागितली. परंतु अनेकवेळा तक्रार करुनही कोणतीही मदत मिळाली नाही. जर मला स्वतःलाच न्याय मिळत नाही तर मी इतरांना कसा न्याय देऊ.सर्वोच्च न्यायालय माझी तक्रार ऐकेल असे मला वाटले होते, पण माझी तक्रार ऐकून, त्यावर विचार न करता याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे मला आता जगण्याची इच्छा उरलेली नाही’ असे सुनीता यांनी म्हटले आहे.
सुनीता यांनी आपल्या पत्रात महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. हिंदुस्थानात काम करणाऱ्या महिलांनी लैंगिक छळ सहन करुन जगायला शिकावे, कारण हेच आपले जीवन आहे असे त्यांनी या पत्रात लिहिले आहे. या महिला न्यायाधीशाचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
























































