ठाण्यात काँग्रेसमध्ये पडली उभी फूट, राष्ट्रवादी उमेदवाराला पाठिंबा देण्यावरून वादाचा भडका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
congress-logo

सामना प्रतिनिधी, ठाणे

सतत अपमानास्पद वागणूक देणाऱ्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही म्हणजे नाहीच, असे दंड थोपटणाऱया ठाण्यातील काँग्रेसमध्येच पाठिंब्यावरून उभी फूट पडली आहे. स्वतःचा ‘स्वार्थ’ साध्य करण्यासाठीच शहरातील काँग्रेसचे काही मोठे पदाधिकारी ब्लॉक अधिकारी व कार्यकर्त्यांना फूस लावण्याचे काम करत असून त्यांचे हे षडयंत्र म्हणजे काँग्रेस आणि राहुल गांधी यांचा विश्वासघात असल्याचे पत्रक ठाणे जिल्हा इंटक काँग्रेस कमिटीने आज काढले आहे. त्यामुळे गटातटाच्या राजकारणावरून अस्तित्व धोक्यात आलेल्या काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला आहे.

ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष मनोज शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांचा प्रचार करणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यामुळे ठाण्यात काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात आले असल्याचे खरमरीत पत्र त्यांनी शहरातील सर्व ब्लॉक अध्यक्षांच्या स्वाक्षऱयांसह प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे धाडले होते. मात्र हा सर्व प्रकार म्हणजे विरोधकांना अप्रत्यक्ष मदत करण्याचा घाट असल्याचे पत्रक आज ठाणे जिल्हा इंटक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन शिंदे यांनी काढले. राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी कायम असून पक्षाध्यक्षाचे पालन करून राष्ट्रवादीचा म्हणून नव्हे तर आघाडीचा उमेदवार म्हणून काँग्रेसचे कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीत सर्व प्रयत्नाने काम करतील, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची व उमेदवाराची भेट घेऊन आपला पाठिंबा जाहीर केला. दरम्यान काँग्रेस पदाधिकाऱयांमध्येच जुंपली असल्याने कार्यकर्ते संभ्रमात पडले असून या अंतर्गत वादामुळे पक्षाची डोकेदुखी आणखी वाढली आहे.