गोपीनाथ मुंडे यांचे ‘हे’ स्वप्न साकार करू, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बीड

लोकसभा निवडणुकीतील भाजपचे यश पाहण्यासाठी आज गोपीनाथ मुंडे साहेब हवे होते, अशी भावना व्यक्त करत माजी उपमुख्यमंत्री, लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आदरांजली वाहिली. यावेळी मराठवाडा ‘दुष्काळमुक्त’ करण्याचे गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न आपण पूर्ण करू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सोमवारी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पाचव्या स्मृतीदिनी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

Photo : मुख्यमंत्री गोपिनाथ गडावर नतमस्तक

आपल्या जीवनात ज्या व्यक्तिकडून शिकायला मिळाले, ज्यांनी आपल्याला घडवलं, ज्यांच्याकडे बघून आपण मोठे झालो, अशा व्यक्तिला आदरांजली वाहण्याची वेळ आपल्यावर मनात अनेक भावना काहूर माजवतात, अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या. राज्यात प्रचंड दुष्काळी परिस्थिती आहे. तसेच मराठवाड्यातही दुष्काळाची तीव्रता प्रचंड आहे. त्यामुळे मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचे गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न आपण पूर्ण करू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना दिले. राज्य सरकारकडून जलसंधारणासाठी जलयुक्त शिवार तसेच इतर अनेक योजना राबवून मराठवाडा पाणीदार करण्याचे काम जोमाने सुरू आहे, असेही ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह रावसाहेब दानवे, मुंडे यांच्या कन्या मंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह विविध मंत्री, खासदार, आमदार व मुंडे समर्थक गोपीनाथ गडावर उपस्थित होते.