
राजेश देशमाने । बुलढाणा
बुलढाणा जिल्हा संपूर्णत: दुष्काळग्रस्त घोषित करण्याबाबत आमदार संजय कुटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून सविस्तर निवेदन देऊन परिस्थिती सांगितली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याबाबत मदत व पुनर्वसन मंत्र्यांना आदेश दिले आहे.
जळगावजामोदचे भाजप आमदार डॉ. संजय कुटे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून बुलढाणा जिल्हा संपूर्णत: दुष्काळग्रस्त घोषित करण्याबाबत चर्चा केली व सविस्तर निवेदन दिले. त्या निवेदनात त्यांनी नमूद केले होते की, बुलढाणा जिल्ह्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने दोन पावसामध्ये मोठा खंड पडल्यामुळे पिकांची परिस्थिती अतिशय खराब आहे. जलयुक्त शिवाराची मोठ्या प्रमाणात कामे झाले. परंतु, पावसाचे प्रमाण कमी झाले व खंड मोठा पडला व परतीचा पाऊस झालाच नाही. त्यामुळे तलावांमध्ये सुद्धा अतिशय कमी पाणीसाठा आहे. जलयुक्त शिवाराच्या कामांमध्ये सध्या पाणी नाही व भूजल पातळी खाली गेलेली आहे. पिण्याच्या पाण्याचे संकट हे भीषण आहे. संपूर्ण जिल्ह्याची आणेवारी 45 पैसे आहे. यापूर्वीही 90 महसूल मंडळांपैकी 73 महसूल मंडळे हे दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहे. उर्वरित 17 महसूल मंडळांवर हा एक प्रकारचा अन्यायच आहे. कारण 17 ही महसूल मंडळामध्ये आणेवारी सुद्धा 45 पैसे यामध्येच आहे व दुष्काळी परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. तरी प्राप्त झालेल्या आणेवारीनुसार व एकंदरीत परिस्थिती पाहता उर्वरित 17 मंडळांमध्ये सुद्धा दुष्काळ घोषित करण्यात यावा व संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याला न्याय द्यावा अशी संजय कुटे यांनी विनंती केली आहे. त्या निवेदनावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत व पुनर्वसन मंत्री यांना पिक कापणी प्रयोगाची आणेवारी 45 टक्क्याच्या आत आल्यामुळे संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा असे आदेश दिले आहे. त्यामुळे आता संपूर्ण बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित होणार आहे.

























































