तूर्त मंदिर, जिम आणि लोकल सुरू होणार नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काही जण म्हणतात, तुम्ही हे उघडलं, ते उघडलं नाही. थांबाहो जरा, मंदिरं सुरू करा हे सांगायला तुम्हाला काय? जबाबदारी तुमच्यावर नाही, आमच्यावर आहे. त्यापेक्षाही जनतेवर आमचं प्रेम आहे. उगाच तंगड्यात तंगडं घालून गोष्टी बंद ठेवण्याची आमची मानसिकता नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘हे उघडा, ते उघडा’ असा सल्ला देण्याऱया विरोधकांना ठोकून काढले.

‘मंदिराच्या विषयावर मी हळूवार जातोय. आता नवरात्री येत आहे, त्यानंतर दिवाळी आहे. खूप काळजीपूर्वक एक-एक पाऊल टाकावे लागणार आहे. उघडलेल्या दरवाजातून सुबत्ता, समृद्धी आली पाहिजे, कोरोना व्हायरस यायला नको तरच त्या उघडलेल्या दरवाजाला अर्थ आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सुनावले.

जिम सुरू करण्याची मागणी होत आहे. जिमवाल्यांशी बोलतो आहोत. त्यांनासुद्धा नियमावली द्यावी लागेल. जिममध्ये आपला सर्वाधिक वेगाने श्वासोच्छ्वास होतो. अशा वेळी जर एखादा कोरोनाग्रस्त असेल तर कोरोना पसरण्याचा धोका अधिक.

लोकल सुरू करण्याची मागणी होत आहे. त्यावरही विचार करीत आहोत. लोकलची संख्या वाढविण्याची मागणी आम्ही केली आहे. ती संख्या वाढल्यानंतर आणखी काही लोकांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल.

आपल्या संतांची शिकवण ही आपल्या जगण्याचा आयुष्यभराचा संस्कार आहे. आजही कोरोना आपल्यातून गेला नाही. त्यामुळे आतापर्यंत सर्व धर्मीयांनी जसे सगळे सण-समारंभ साधेपणाने साजरे केले तसेच येणारे नवरात्र आणि दसरा, दिवाळी हे सणही साधेपणाने साजरे करावेत.