
महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱया परीक्षा पद्धतीबाबत आलेल्या तक्रारींची तातडीने दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. पुढील आठवडय़ात होणारी पशुसंवर्धन विभागातील पदभरती परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्रुटी दूर करून ही परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारेच ऑनलाइनरीत्या घेण्यात यावी, असे आदेशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
महापरीक्षा पोर्टलमधील त्रुटींबाबतअनेक निवेदने, तक्रारी मुख्यमंत्री कार्यालयात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन याबाबत मागणी केली होती. यापार्श्वभूमीवरमाहिती तंत्रज्ञान विभागाची आढावा बैठक मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, आमदार आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता आदी उपस्थित होते. राज्य शासनाच्या विविध विभागांतील भरतीसाठी महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱया परीक्षांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की,महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱया परीक्षापद्धतीबाबतच्या तक्रारी,समस्यांबाबत तक्रारधारकांसोबत आठवडाभरात बैठक घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. त्यानंतर या पद्धतीबाबतच्या त्रुटी दूर करण्याच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्यात येतील. पुढील आठवडय़ात होणारी पशुसंवर्धन विभागातील पशुसंवर्धन पर्यवेक्षक आणि परिचर पदांसाठीची भरती परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. त्रुटी दूर करुन ही परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारेच ऑनलाईनरित्या घेण्यात येईल.
शासकीय डेटा सुरक्षिततेसाठी सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर (एसओसी) चे उद्घाटन झाले. राज्य शासनाच्या‘स्टेट डेटा सेंटर’च्या सर्व्हरमध्ये सर्व शासकीय संकेतस्थळांवरील डेटा ठेवलेला असतो. हा डेटा तसेच क्लाऊडवरील शासनाचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि कोणत्याही बाह्य प्रणालीद्वारे सायबर हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी हे सेंटर स्थापन करण्यात आले आहे, असे सांगण्यात आले. यावेळी प्रधान सचिव भूषण गगराणी,महाआयटीचे महाव्यवस्थापक अजित पाटील, माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सहसचिव स्वाती म्हसे-पाटील, माहिती तंत्रज्ञान संचालनालयाचे संचालक अमोल येडगे आदी उपस्थित होते

























































