वने आयुष्याचा भाग… ती जपायला हवीत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वनसंहितेचे प्रकाशन

वने ही आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटात आपल्याला झाडांची आठवण होते. पण एकीकडे झाडांची कत्तल करायची आणि दुसरीकडे ग्लोबल वॉर्मिंगवर बोलायचे हे बरोबर नाही. जे वन आज आपल्याकडे आहे ते जपले पाहिजे, वाढवले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज नवीन ‘वनसंहिते’चे प्रकाशन तसेच ई-वाहतूक परवाना पद्धतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, वन विभाग वनसंवर्धनाचे महत्त्वाचे काम करत आहे. त्यासाठी त्यांना पुढच्या पिढीच्या वतीने मी धन्यवाद देतो. जंगलातील वन्य जीवांनाही निसर्गाने घालून दिलेले नियम ते पाळतात, मात्र आपण आपल्या सोयीप्रमाणे नियम करतो आणि मोडतो. तसे होऊ नये म्हणून विभागाने तयार केलेली नवीन वनसंहिता अतिशय महत्त्वाची. यातून वनांसदर्भातील एकत्रित माहिती मिळू शकेल. या बैठकीला वनमंत्री संजय राठोड, पर्यावरण तसेच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान सचिव विकास खारगे आदी उपस्थित होते.

सायकल ब्रँड अगरबत्तीसोबत करार

यवतमाळ येथील अगरबत्ती पेंद्रासाठी सायकल अगरबत्ती ब्रँडसोबत सामंजस्य करार करण्यात आला. सायकल ब्रँड अगरबत्तीसाठी केलेल्या सामंजस्य कराराने गरीब दुर्गम भागात काम करणाऱया महिलांना वन विभागाने उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून दिला. मोहाप्रमाणे इतर वनात उगवणाऱया वनस्पती लोकांना उपलब्ध करून दिल्यास जंगल आपल्या जगण्यासाठी उपयुक्त असते हे लोकांना कळेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या