
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शनिवरी विधानसभेतील पहिलेच भाषण दणदणीत आणि तडाखेबंद झाले. राष्ट्रपुरुषांची नावे घेऊन मंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या मुद्दय़ावरून टीका करणार्या भाजपला मुख्यमंत्र्यांनी जोरदार उत्तर दिले. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी मी छत्रपती शिवाजी महाराजांची, आईवडिलांची शपथ घेतली म्हणून विरोधकांना इंगळ्या डसल्या. राष्ट्रपुरुषांची आणि आईवडिलांची शपथ घेणे हा जर गुन्हा असेल तर हा गुन्हा एकदा नव्हे, दहा वेळा करीन. अशी शपथ मी प्रत्येक जन्मात घेईन, अशा शब्दांत ते विरोधकांवर बरसले. आपण ज्या राष्ट्रपुरुषांचे नाव घेऊन महाराष्ट्राचा कारभार सुरू केला आहे त्या राष्ट्रपुरुषांना अपेक्षित आहे असा महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे, असा निर्धारही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठराव 169 विरुद्ध 0 मतांनी मंजूर झाल्यानंतर विश्वासदर्शक प्रस्तावावर त्यांनी आभार मानणारे भाषण केले. मुख्यमंत्री सभागृहात भाषणाला उभे राहताच शिवसेना आमदारांनी व सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘महाराष्ट्र विकास आघाडीचा विजय असो’ अशा जोरदार घोषणा दिल्या.
छत्रपती शिवराय दैवत
सरकारवर सदनाने व्यक्त केलेल्या विश्वासाबद्दल उद्धव ठाकरे यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले. त्यावर सत्ताधारी पक्षाच्या सर्व सदस्यांनी बाके वाजवून आनंद व्यक्त केला. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेचेही आभार मानले. महाराष्ट्रातील जनतेच्या आशीर्वादाशिवाय हा कारभार करता येणार नाही असे सांगून ते पुढे म्हणाले की, आयुष्यात प्रथमच या सभागृहात येत आहे. सभागृहात आलो हे माझे भाग्य आहे. छत्रपती शिवरायांना वंदन करून या सभागृहात प्रवेश केला. या देशात अनेक राज्ये आहेत. त्यात आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत आहे. हा देश आपलाच आहे, पण हे दैवत ज्या मातीत जन्माला आले त्या मातीत जन्मलेले आम्ही सर्व शिवभक्त आहोत.
समाजसुधारकांचा महाराष्ट्र अपेक्षित
विरोधकांनी सकाळी घातलेल्या गोंधळाचा उल्लेख करीत ते म्हणाले की, विरोधकांशी सामना करणे ठीक आहे. राजकीय-वैचारिक मतभेद असतात; पण ते मांडण्याची एक पद्धत असते. मात्र ही पद्धत बाजूला ठेवून नको ते विषय सभागृहात विरोधकांनी काढले. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आम्हाला जो महाराष्ट्र अपेक्षित आहे तो साधू-संतांचा, वीरांचा आणि क्रांतिकारकांचा, समाजसुधारकांचा महाराष्ट्र अपेक्षित आहे. त्यांना अभिमान वाटेल असा महाराष्ट्र आपण घडवायचा आहे आणि तो घडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
मी शत्रूला अंगावर घेणारा
विरोधकांनी सभात्याग केल्यामुळे समोरच्या बाकांवर कोणीही नव्हते त्याकडे अंगुलीनिर्देश करीत उद्धव ठाकरे म्हणाले की, रिकाम्या बाकांशी मी लढणार नाही; कारण मोकळ्या मैदानात तलवारबाजी करणाऱयांपैकी मी नाही. मी समोरासमोर लढणार आहे, शत्रूला अंगावर घेणारा आहे. आता इथे कोणी शत्रू नाही. दुर्दैवाने राजकीय विरोधक आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांनी शपथ घेण्यापूर्वी राष्ट्रपुरुषांचे नाव घेतले होते. त्यावरून विरोधकांनी गोंधळ घातला होता. त्याचा समाचार घेताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सभागृहात येण्यापूर्वी दडपण होते. वागायचे कसे हा प्रश्न होता. कारण मी मैदानातील माणूस. या वैधानिक कामकाजाचा अनुभव नाही, पण या ठिकाणी आल्यावर मैदानच चांगले असे मला वाटू लागले. (हंशा)
शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र
सभागृहात लावलेल्या राष्ट्रपुरुषांच्या तसबिरींचा संदर्भ देत ते पुढे म्हणाले की, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र. आणि या राष्ट्रपुरुषांचे नाव घेऊन शपथ घेतली तर विरोधकांना इंगळ्या डसल्या. हो, मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली, आईवडिलांची शपथ घेतली आणि पुन्हा घेईन. वास्तविक, हा सभागृहाचा मुद्दा होऊ शकत नाही असे स्पष्ट करून ते म्हणाले की, हा सभागृहाचा मुद्दा नसला तरी प्रत्येकाच्या अंतःकरणाचा मुद्दा आहे. जो आपल्या दैवताला मानत नाही, आईवडिलांना मानत नाही तो पुत्र म्हणून जगायच्या लायकीचा नाही. (टाळ्या)





























































