
राज्यातील जिल्हा बँकांबरोबरच सर्व नागरी सहकारी बँकांना लवकरच सायबर सुरक्षा कवच मिळणार आहे. सध्या सायबर भामटे वेगवेगळय़ा व्हायरसच्या माध्यमातून बँकांच्या सर्व्हरवर हल्ला करून बँकांना मोठा गंडा घालत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच जिल्हा सहकारी बँका आणि नागरी सहकारी बँकांना सायबर सुरक्षेचे कवच देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक तब्बल 300 कोटी रुपये खर्चून ‘सायबर सिक्युरिटी सेंटर’ (सॉक) उभारणार आहे. कोणतेही शुल्क न आकारता राज्य बँक ही सेवा इतर बँकांना देणार आहे.
राज्य बँकेने सर्व सहकारी बँकांसाठीच स्वतंत्र सायबर सिक्युरिटी सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचे बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी सांगितले.
या व्हायरसपासून मिळणार संरक्षण
सध्या रॅम्सवेअर, ट्रोझन, मालवेअर, डी-कॉय या व्हायरसच्या माध्यमातून बँकांच्या सर्व्हरला लक्ष्य केले जात आहे. त्याला चाप लावण्यासाठी ‘सॉक’ यंत्रणा उभारण्यात येणार आहे. ही यंत्रणा बँकेच्या सर्व्हरमध्ये घुसण्याचा प्रयत्न झाल्यास त्याची माहिती तत्काळ बॅकेला पुरवणार आहे. तसेच प्रतिबंधात्मक पावले उचलणार आहे.






























































