पुणे-बंगळुरू महामार्गावर शॅम्पूच्या बाटलीतून कोकेनची तस्करी, नायजेरियन तरुणाकडून 16 लाखांचे कोकेन जप्त; ईश्वरपूर पोलिसांची पेठ नाक्यावर कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खासगी ट्रॅव्हल्सच्या बसमधून प्रवास करणाऱ्या नायजेरियन तरुणाकडील शॅम्पूच्या बाटलीतून 163.610 ग्रॅम कोकेन पोलिसांनी जप्त केले आहे. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पेठ नाक्याजवळ ही कारवाई करण्यात आली. या कोकेनची किंमत 16 लाख 30 हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

एडवर्ड जोसेफ इदेह (वय 35, मूळ रा. नायजेरिया, सध्या रा. बंगळुरू) असे अटक केलेल्या नायजेरियन तरुणाचे नाव आहे. न्यायालयाने त्याला 1 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पुणे-बंगळुरू महामार्गावरील पेठनाक्याजवळ शर्मा ट्रव्हल्सच्या बसमधून अमली पदार्थांची वाहतूक होणार असल्याची माहिती ईश्वरपूरचे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांना मिळाली होती. त्यामुळे पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्यासह पथकाने महामार्गावर नाकाबंदी लावली होती. शर्मा ट्रव्हल्स कंपनीची बस आली असता, पोलिसांनी या बसला थांबवून तपासणी सुरू केली. यावेळी एडवर्ड जोसेफ इदेह याची अंगझडती घेतली असता, त्याच्या काळ्या रंगाच्या सॅकमध्ये एक सनसिल्क ब्लॅक शाईन शॅम्पूची 650 मिलीची बाटली आढळून आली. या बाटलीत कोकेनच्या 15 कॅप्सूल्स आढळल्या. या कोकेनचे वजन 163.610 ग्रॅम इतके असून, त्याची अंदाजे किंमत 16 लाख 30 हजार रुपये आहे. या आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी कोकेनसह 16 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे तपास करीत आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख दीक्षितकुमार गेडाम, अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, देवेंद्र सासणे, शरद जाधव, प्रशांत देसाई, अरुण कानडे, सचिन यादव, संग्राम गायकवाड, संताजी पाटील, चंद्रकांत कोळी, सचिन सुतार यांनी ही कारवाई केली आहे.

महिनाभरापूर्वीही 11 लाखांचे कोकेन हस्तगत

ईश्वरपूर पोलिसांनी 25 नोव्हेंबर रोजीच राष्ट्रीय महामार्गावरील वाघवाडी फाटा येथे कोकेन घेऊन जाणाऱ्या टांझानियाच्या तरुणाला अटक केली होती. त्याच्याकडून 11 लाखांचे 109 ग्रॅम कोकेन हस्तगत करण्यात आले होते. दरम्यान, महामार्गावरून होत असलेल्या अमली पदार्थांच्या तस्करीत परदेशी तरुणांचा सहभाग यंत्रणेसमोर आव्हान ठरत आहे.