
सामना प्रतिनिधी, नाशिक
नाशिक जिह्यात आज सलग चौथ्या दिवशीही थंडीची लाट कायम आहे. निफाडमध्ये 2.8 अंशांवर पारा घसरला होता. कळवणला 3.2, तर नाशिकला 7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. पुढील चार-पाच दिवस थंडीचा कडाका कायम राहणार आहे. द्राक्षबागांसह रब्बीच्या पिकांवर अतिथंडीचे दुष्परिणाम वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
उत्तर हिंदुस्थानातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात प्रचंड गारठा जाणवत आहे. निफाडजवळील कुंदेवाडी गहू संशोधन केंद्रात गुरुवारी या हंगामातील सर्वात नीचांकी 1.8 अंश सेल्सिअस तापमान होते, काल मात्र येथे 3 अंशांवर पारा पोहचला होता. आज पुन्हा तापमानात घसरण दिसून आली, किमान 2.8 व कमाल 25 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
नाशिक शहरात शनिवारी या हंगामातील नीचांकी 5.1 अंश सेल्सिअस तापमान होते. आज तापमान 2 अंशांनी वाढले, 7 अंशांवर पारा पोहचला, कमाल तापमान 25.8 होते. बोचऱया वाऱयामुळे दिवसभर थंडीचा कडाका कायम राहिल्याने लोकांनी ठेवणीतले थंडीचे कपडे वापरायला काढल्याचे पाहायला मिळाले. सलग चौथ्या दिवशीही गारठय़ाने जिल्हावासीय हैराण झाले आहेत. सायंकाळच्या सुमारास गजबजणाऱया रस्त्यांवर आता काहीसा शुकशुकाट असतो. कळवणजवळील मानूर येथे काल नीचांकी 1.9 तापमान होते, आज 3.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. चार दिवसांपासून शीतलहरी जाणवत असल्याने द्राक्षबागेतील मणी व पाने जळाल्यागत झाली आहेत.
रब्बीच्या पिकांवरही दुष्परिणाम
वातावरणाच्या या बदलाचा फटका रब्बीच्या पिकांवरही बसत असल्याने त्याचे दुष्परिणाम जाणवत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या तीन दिवसात नाशिकचा पारा 4 अंशांवर घसरणार आहे, कमाल तापमानही 23 अंशाच्या घरात राहील, अशी शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱयांच्या चिंतेत भर पडली आहे.

























































