
सामना ऑनलाईन । पुणे
थंडीने जणू थर्ड डिग्री ट्रिटमेंटच दिली आहे. तापमापकातील पारा बुलेट ट्रेनच्या वेगाने घसरत असून अवघ्या राज्यालाच हुडहुडी भरली आहे. आज नाशकातल्या मानूरमध्ये 1.1 तर नगर आणि परभणीत 3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुंबईत मात्र गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत आज थंडीचा जोर कमीच होता. मुंबईत 20 अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदवले गेले.
कोकण किनारपट्टीसह विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील किमान आणि कमाल तापमानात शनिवारी लक्षणीय घट झाली. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागांत थंडीची लाट आल्याचे चित्र पाहायला मिळाले. पुणे, मालेगाव, नाशिक, संभाजीनगर, अकोला या जिह्यांतील किमान तापमानाचा पारा 6 अंश सेल्सियस खाली होता तर जळगाव, गोंदियात 6 अंश तापमान होते. नागपुरात सर्वात कमी 3.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवस राज्यात थंडीचा कडाका कायम राहील, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.
सध्या उत्तरेकडील बहुतांश राज्यांत थंडीची लाट आलेली आहे. त्यामुळे गुजरातच्या काही भागांसह उत्तर-मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट आली आहे. याशिवाय मराठवाडा आणि विदर्भातही किमान तापमान घटले आहे.
15 वर्षांनंतर परभणी जिल्हय़ात किमान तापमान आज 3 अंश सेल्सिअसपर्यंत आले. कोकणात डहाणू येथे किमान तापमानात सरासरीपेक्षा 4.4 अंशाची घट होऊन 13 अंश सेल्सिअसवर खाली आले. यंदा नागपूरात थंडीने 80 वर्षांचा विक्रम मोडित काढला असून, पारा प्रथमच 3 अंश सेल्सिअसपर्यंत शनिवारी घसरला.
महाराष्ट्राचे कश्मीर समजल्या जाणाऱया महाबळेश्वरमध्ये सलग दुसऱया दिवशी दवबिंदू गोठले. येथील प्रसिद्ध वेण्णा तलाव परिसरात थंडीचा कडाका पडल्याने दवबिंदू गोठून हिमकण जमा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
























































